अजय टप
मोताळा (प्रतिनिधी): तालुक्यातील महाळुंगी जाहगीर येथे पैशांच्या व्यवहारातून दोन कुटुंबांमध्ये काल संध्याकाळी जोरदार राडा झाला. या प्रकरणी धामणगाव बडे पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही बाजूंनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महाळुंगी जाहगीर येथील रमाबाई धोंडू शेळके (वय ६७ वर्षे) यांच्या तक्रारीनुसार, पैशांच्या कारणावरून आरोपी संदीप रमेश काळे आणि आशा संदीप काळे यांनी त्यांच्याशी वाद घातला. आरोपी संदीप काळे याने फिर्यादीचा उजवा हात धरून ओढले आणि ‘तुला दाखवतो’ असे म्हणत विनयभंग व अपमान केला. तसेच दोन्ही आरोपींनी रमाबाई आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ केली. तसेच काठीने आणि चापट-बुक्क्यांनी मारहाण करून “गल्लीत येणे बंद करून टाकीन” अशी धमकी दिली. या प्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ११८(१), २९६, ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर याच प्रकरणात आशा संदीप काळे (वय ३८ वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीकृष्ण शेळके आणि प्रवीण शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशा काळे यांच्या फिर्यादीनुसार, त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर हा वाद झाला. आरोपी श्रीकृष्ण शेळके याने फिर्यादीचा डावा हात धरून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. आरोपीने आशा काळे यांच्या पतीच्या डोक्यात विटेचा तुकडा मारून गंभीर दुखापत केली. तसेच आरोपींनी पती-पत्नीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या दोन्ही गुन्ह्यांचा तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राजेंद्र राणे हे करीत आहेत. एकाच गावातील आणि ओळखीच्या असलेल्या या दोन्ही कुटुंबांमधील आर्थिक वाद विकोपाला गेल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. वृद्ध महिला आणि महिलांवरील विनयभंगाच्या आरोपांमुळे या प्रकरणाला गांभीर्य प्राप्त झाले आहे.