मोताळा,(प्रतिनिधी): क्रीडा क्षेत्रात बुलढाणा जिल्ह्याचा मानाचा तुरा रोवत, सहकार विद्या मंदिर, मोताळा येथील १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने पालघर (मुंबई) येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘टग ऑफ वॉर’ (रस्सीखेच) स्पर्धेत अभूतपूर्व यश संपादन केले. ३० व ३१ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना या खेळाडूंनी आपल्या ताकदीच्या जोरावर मैदान गाजवले.
या स्पर्धेत सहकार विद्या मंदिरच्या संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत केरळ, कर्नाटक, गुजरात आणि हिमाचल प्रदेश यांसारख्या बलाढ्य राज्यांच्या संघांना धूळ चारली. अंतिम सामन्यात या संघाचा सामना कुवेत संघाशी झाला. या अटीतटीच्या सामन्यात मोताळाच्या लेकरांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना नमवून राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले व सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.
या ऐतिहासिक विजयात ओम गणेशराव घडेकर, मोहित मारुती खिरोडकर,वीरेन लक्ष्मण गालवंशी, शिवम निना कोलते, भावेश विष्णू क्षीरसागर, ओम सोपान चौधरी, सुमित अविराज शिंबरे, शिवराज श्रीराम निळे, निलेश दिनकर राठोड, हरीश गणेश जवरे या खेळाडूंचा मोलाचा वाटा राहिला. त्यांना क्रीडा शिक्षक उमेश माळी सर, दिलीप सातव सर आणि प्रशिक्षक श्रीराम निळे सर यांचे कठोर परिश्रम व योग्य मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे मुख्याध्यापक अभिजीत देशमुख यांनी सातत्याने खेळाडूंना प्रोत्साहन दिले. या दैदिप्यमान यशानंतर बुलढाणा अर्बन परिवारातील मान्यवरांनी खेळाडूंचे वैयक्तिक शब्दांत कौतुक केले आहे. या यशामुळे मोताळा तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुलांमध्ये जिद्द आणि ताकद दोन्ही आहे:राधेश्यामजी चांडक
“सहकार विद्या मंदिरच्या या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर जे यश मिळवले आहे, ते केवळ शाळेचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्वल करणारे आहे. या मुलांमध्ये जिद्द आणि ताकद दोन्ही असल्याचे बुलढाणा अरबांचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक म्हणाले.
खेळाडूंचा आम्हाला सार्थ अभिमान आहे;डॉ.सुकेजी झंवर
राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा झेंडा फडकवणाऱ्या या सुवर्णमयी खेळाडूंचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमची ही मेहनत भविष्यात तुम्हाला अजून मोठ्या शिखरावर नेईल, असा विश्वास बुलढाणा अरबांचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ.सुकेजी झंवर यांनी व्यक्त केला.
सांघिक कौशल्य थक्क करणारे:कोमलजी झंवर
मुलांनी दाखवलेले सांघिक कौशल्य थक्क करणारे आहे. या विजयाने ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळेल. हा विजय सहकार विद्या मंदिर मोताळा व मोताळा तालुक्यासाठी सुवर्णक्षण असल्याचे बुलढाणा अर्बन चॅरिटेबलच्या अध्यक्षा कोमलजी झंवर म्हणाल्या.