मोताळ्यात ‘डॉन’ची दहशत; किरकोळ वादातून मजुराला लाकडी काठीने बेदम मारहाण

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): “मी इथला डॉन आहे, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही,” अशी गर्जना करत एका तरुणाला आणि त्याच्या काकांना लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना मोताळा येथील खरबडी फाट्यावर घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये तीन सख्ख्या भावांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

मोताळा शहरातील वार्ड नंबर ५ मध्ये राहणारा शेख रियान शेख इरफान (वय १९ वर्षे) हा मजूर म्हणून काम करतो. २० मार्च २०२६ रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास रियान हा खरबडी फाट्यावर उभा असताना, आरोपी शेख साजिद शेख सुपडू उर्फ बाब्या हा त्याच्याजवळ आला. साजिदने रियानला अडवून, “माझा भाऊ शेख राजिक याची गाडी तू भाड्याने नेली होतीस, त्याचे पैसे आत्ताच्या आत्ता दे,” अशी मागणी केली. त्यावर रियानने “नमाज झाल्यावर पैसे देतो,” असे उत्तर दिले.

‘मी डॉन आहे’ म्हणत केला हल्ला

रियानच्या उत्तराने संतापलेल्या शेख साजिदने आरडाओरडा सुरू केला. “मी डॉन आहे, तुला इथेच कापून टाकीन, माझे कोणी काही उखाडू शकत नाही,” अशी धमकी देत त्याने जवळच असलेली लाकडी काठी उचलली आणि रियानच्या पाठीवर सपासप वार केले. एवढ्यावरच न थांबता त्याने रियानच्या तोंडावर, डोक्यात आणि चेहऱ्यावर चापटी व बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

हल्ला सुरू असतानाच आरोपीचे इतर दोन भाऊ, शेख शाबीर शेख सुपडू आणि शेख राजिक शेख सुपडू हे देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनीही रियानला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादीचे काका शेख शाहरुख शेख मुसा हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आले असता, तिन्ही आरोपींनी त्यांच्याही पोटात बुक्क्या मारून त्यांना दुखापत केली. “येथे माझीच दहशत आहे, माझ्या नादी लागू नका नाहीतर तुमचा खून करीन,” अशी धमकी देऊन आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली.

आपल्याला व आपल्या कुटुंबाला या आरोपींपासून धोका असल्याचे लक्षात आल्यावर शेख रियानने तातडीने बोराखेडी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शेख साजिद शेख सुपडू उर्फ बाब्या, शेख शाबीर शेख सुपडू आणि शेख राजिक शेख सुपडू (सर्व रा. वार्ड नं. ४, मोताळा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस पोलीस अंमलदार कपीश काशपाग हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!