अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): लोणार ते सरस्वती रोडवरील कब्रस्तानजवळ एका ३५ वर्षीय तरुणावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उमेश विठोबा भागडे (वय ३५ वर्षे) रा. सरस्वती, ता. लोणार) हे २९ मार्च २०२६ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आपले मित्र शाम प्रकाश जाधव यांच्यासोबत मोटारसायकलने लोणारवरून आपल्या गावाकडे (सरस्वती) जात होते. लोणार ते सरस्वती रोडवर असलेल्या कब्रस्तानजवळील टेकड्यांच्या गेटसमोर आरोपी शादाबखान सालरखान (रा. घरकुल, लोणार) हा त्याच्या एका मित्रासह मोटारसायकल घेऊन उभा होता. उमेश भागडे तिथे पोहोचले असता, आरोपीने त्यांना मोटारसायकल थांबवण्याचा इशारा केला. उमेश यांनी गाडी थांबवून “काय झाले?” अशी विचारणा केली असता, कोणत्याही कारणाशिवाय आरोपीने त्यांच्या तोंडावर जोरात बुक्का मारला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गोंधळलेल्या उमेश यांनी “मला का मारले?” असा जाब विचारला. यावेळी आरोपी शादाबखान याने त्यांना धक्काबुक्की करत आपल्याकडील धारदार चाकू बाहेर काढला. आरोपीने उमेश यांच्या अंगावर चाकूने दोन वार केले, मात्र उमेश यांनी प्रसंगावधान राखत ते वार हुकवले. परंतु, आरोपीने केलेला तिसरा वार उमेश यांच्या छातीवर बसला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडले.हल्ल्यानंतर उमेश यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला असता, आरोपीने “तुला आज खलास करतो” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून आरोपीच्या मित्राने त्याला तेथून बाजूला नेले आणि दोघेही घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेनंतर जखमी उमेश भागडे यांनी लोणार पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शादाबखान सालरखान याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८(२), ११५(२) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी गणेश इंगोले हे करीत आहेत.
या घटनेमुळे लोणार परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून, या हल्ल्यामागे नेमके काय कारण होते, याचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले करत आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यात थांबवून अशा प्रकारे होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.