विशेष बातमी: नांदुरा परिसरात वाळू माफियांचा नंगा नाच

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी) : एकीकडे उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी नदीपात्रे कोरडी पडत असताना, दुसरीकडे याच कोरड्या पात्रातून सोन्यासारखी मौल्यवान वाळू ओरबाडण्याचे काम अहोरात्र सुरू आहे. नांदुरा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रासह जिल्ह्यातील खडकपूर्णा आणि इतर उपनद्यांमधून राजरोसपणे सुरू असलेल्या या लूटमारीने आता सीमा ओलांडली आहे. आज, १९ मार्च २०२६ रोजी पहाटे प्रशासनाने केलेल्या एका नावापुरत्या कारवाईने प्रशासन केवळ ‘दिखाव्यासाठी’ दोन-चार ट्रॅक्टर पकडते, पण यामागील मुख्य सूत्रधार मात्र एसी केबिनमध्ये बसून ‘वसुली’चे गणित मांडत आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

नांदुरा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून रात्रीच्या अंधारात जेसीबी आणि पोकलेनच्या साहाय्याने नदीपात्राची अक्षरशः चाळण केली जात आहे. पूर्णा नदीचे पात्र, जे या भागाची जीवनवाहिनी आहे, ते आता खोल खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा बनले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत नांदुरा आणि मलकापूरच्या सीमेवरील भागात शेकडो ट्रॅक्टर आणि डंपर वाळूची अवैध वाहतूक करत असतात. मग प्रश्न पडतो, या गाड्या भररस्त्यातून जाताना आरटीओ, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाचे डोळे मिटलेले असतात का?

वाळू उपशामुळे केवळ निसर्गाचे नुकसान होत नाहीये, तर सर्वसामान्य माणसाचे जगणेही मुश्कील झाले आहे. ओव्हरलोड वाळू भरून वेगाने धावणाऱ्या ट्रॅक्टरमुळे नांदुरा परिसरातील नूतनीकरण केलेल्या ग्रामीण रस्त्यांचे पूर्णपणे बारा वाजले आहेत. रस्त्यावर पडलेल्या वाळूमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यातच एका अपघातात एका तरुण शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला होता. या मृत्यूला जबाबदार कोण? हे वाळू माफिया की त्यांना पाठीशी घालणारे भ्रष्ट अधिकारी?,असा संतप्त प्रश्न कायदेप्रिय नागरिक विचारत आहेत.

आजची ‘साहेबांची’ धाड: कारवाई की केवळ सोपस्कार?

आज पहाटे महसूल विभागाने नांदुरा शिवारात कारवाई करत २ ते ३ वाळूचे ट्रॅक्टर जप्त केले. ही बातमी ऐकायला चांगली वाटत असली, तरी वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. रोज जिथे शेकडो गाड्यांची ये-जा सुरू असते, तिथे केवळ दोन गाड्या पकडून प्रशासन आपला ‘कार्यक्षमता’ दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. पकडलेले ट्रॅक्टर हे बहुधा छोट्या वाळू चोरांचे असावेत, पण जे मोठे ‘किंगपिन’ आहेत, त्यांच्या गाड्यांना कुणी हात का लावत नाही? हा प्रश्न आता नांदुराहून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विचारला जात आहे.

खडकपूर्णा पात्रातील जनआंदोलनाचा २० वा दिवस: संवेदना हरवलेले प्रशासन!

जिल्ह्याच्या दुसऱ्या बाजूला, म्हणजे देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध उत्खननाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा आज विसावा (२० वा) दिवस आहे. भर उन्हात शेतकरी आणि ग्रामस्थ नदीपात्रात बसून “आमची वाळू आमचा अधिकार” अशी घोषणा देत आहेत. मात्र, २० दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस कारवाईचे आश्वासन मिळत नाही, हे लोकशाहीचे दुर्दैव म्हणावे लागेल. येथील वाळू माफियांनी गुंडांचा वापर करून आंदोलकांना धमकावण्याचे प्रकारही घडले आहेत, तरीही पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत.

जिल्हा प्रशासनाने द्यावे उत्तर

जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव झाला नसतानाही, रोज हजारो ब्रास वाळू बाजारात येते कुठून? पोलीस आणि महसूल विभागाच्या नाकाखालून वाळूचे ट्रक राजरोसपणे कसे जातात? खडकपूर्णा नदीपात्रातील आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे कारण काय? कुणाची ‘सुपारी’ घेतली आहे का? ज्या रस्त्यांवरून वाळूचे टिप्पर जातात, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे का बसवले जात नाहीत?, या प्रश्नांचा जिल्हा प्रशासन जाहीर खुलासा करणार का?, असा तिखट सवाल कायदप्रिय नागरिक विचारत आहेत.

  • आता जनताच शिकवणार धडा!
  • प्रशासनाने येत्या काही दिवसांत या वाळू माफियांचा कायमचा बंदोबस्त केला नाही, तर नांदुरा आणि संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. “आमची नदी आमची आई” मानणाऱ्या या मातीने आता क्रांतीचा झेंडा हाती घेतला आहे. प्रशासनातील ‘झारीतील शुक्राचार्यांनी’ हे लक्षात घेण्याची गरज असून जनतेचा रोष एकदा उफाळून आला की, खाकी आणि पांढरपेशी दोन्ही पदरे या वाळूच्या वादळात उडून गेल्याशिवाय राहणार नाही, एवढे मात्र खरे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!