अजय टप
चिखली,(प्रतिनिधी): माणूस जेव्हा रक्ताच्या नात्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा तो जगातील कोणत्याही संकटाशी लढायला तयार असतो. मात्र, जेव्हा तेच रक्ताचं नातं विश्वासाला तडा देतं, तेव्हा होणाऱ्या वेदना शब्दांच्या पलीकडे असतात. चिखली तालुक्यातील ‘वळती’ गावातून समोर आलेली एक घटना सध्या संपूर्ण जिल्ह्याभरात चर्चेचा विषय ठरली आहे. एका १९ वर्षीय तरुण मुलीने ‘परीक्षेचा फॉर्म’ भरण्याच्या नावाखाली आईकडून घेतलेले ५०० रुपये आणि त्यानंतर पालकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा तो एक फोन कॉल… ही केवळ एका मुलीची ‘मिसिंग’ची तक्रार नाही, तर बदलत्या काळातील विस्कळीत होत चाललेल्या कौटुंबिक संवादाचे दाहक वास्तव आहे.
वळती येथील गजानन श्रीराम जाधव हे व्यवसायाने चालक आहेत. रस्ते तुडवत, दिवस-रात्र कष्ट करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आपली मुले शिकावीत, मोठी व्हावीत आणि सन्मानाने जगावीत, हीच प्रत्येक मध्यमवर्गीय बापाची इच्छा असते. गजानन यांची १९ वर्षांची मुलगी पूजा हिच्याकडूनही त्यांना हीच अपेक्षा होती. मात्र, १ एप्रिल २०२६ ची ती सकाळ जाधव कुटुंबासाठी काळ बनून येईल, याची कोणालाही कल्पना नव्हती. १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पूजाने आपल्या आईकडे गळ घातली. “आई, मला परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे, कॉलेजला जावे लागेल, मला ५०० रुपये दे,” असे तिने सांगितले. लेकीच्या शिक्षणासाठी आईनेही पदरचे ५०० रुपये तिच्या हाती टेकवले. डोक्यावर मोरपंखी रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात सँडल आणि डोळ्यात भविष्याची स्वप्ने (किंवा काहीतरी वेगळीच योजना) घेऊन पूजा घरून निघाली. आई-वडिलांना वाटले, मुलगी फॉर्म भरून संध्याकाळपर्यंत घरी येईल. मात्र, तास सरकत गेले, सूर्यास्त झाला, पण पूजा काही परतली नाही.
तो एक कॉल आणि उडाली झोप!
जेव्हा रात्र झाली आणि पूजा घरी आली नाही, तेव्हा गजानन जाधव यांची अस्वस्थता वाढली. त्यांनी तात्काळ तिच्या मोबाईलवर संपर्क साधला. अनेक प्रयत्नांनंतर जेव्हा संपर्क झाला, तेव्हा पूजाने जे सांगितले ते ऐकून गजानन जाधव यांच्या हातातील मोबाईल गळून पडायची वेळ आली. पूजा म्हणाली, “मी विशाल रिठे (रा. छत्रपती संभाजीनगर) याच्यासोबत लग्न केले आहे. तुम्ही माझा शोध घेऊ नका, मी माझ्या मर्जीने निर्णय घेतला आहे.” एका क्षणात एका पित्याचा विश्वास धुळीला मिळाला. ज्या मुलीला परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी पैसे दिले, ती थेट दुसऱ्या शहरात जाऊन लग्नाच्या बेडीत अडकल्याची बातमी देणे, हे कोणत्याही पालकांसाठी असह्य आहे.
कायदेशीर कारवाई आणि पोलिसांचा तपास
धक्का बसलेल्या गजानन जाधव यांनी वेळ न घालवता चिखली पोलीस स्टेशन गाठले. आपल्या मुलीचा शोध घ्यावा आणि ती नेमकी कुठे आहे, कोणासोबत आहे, याची खात्री करावी यासाठी त्यांनी फिर्याद दिली. चिखली पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मिसिंग दाखल केली आहे. पुढील तपास राजू सुसर हे करीत आहेत.
जन्मदात्यांशी असे वागणे कितपत योग्य?
ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समाजात दोन गट पडले आहेत. काही लोक याला ‘प्रेम’ मानत आहेत, तर बहुतांश लोकांच्या मते हा ‘विश्वासघात’ आहे. परीक्षेच्या नावाखाली पैसे घेऊन पळून जाणे, हे शिक्षणाच्या पवित्र हेतूला काळिमा फासणारे आहे. चालक म्हणून काम करणाऱ्या वडिलांच्या कष्टाची जाणीव तरुण पिढीला का उरली नाही?, सोशल मीडिया किंवा मोबाईलच्या माध्यमातून ओळख झालेल्या व्यक्तीवर इतका आंधळा विश्वास ठेवून घर सोडणे किती सुरक्षित आहे?, या प्रश्नांचे चिंतन होण्याची गरज आहे.
तरुणाईला आवाहन आणि पालकांना इशारा
आजच्या धावपळीच्या युगात संवाद हरवत चालला आहे. मुले काय करतात, कोणाशी बोलतात, त्यांच्या मनात काय सुरू आहे, हे जाणून घेणे पालकांसाठी आव्हान ठरत आहे. दुसरीकडे, तरुण पिढीला वाटते की त्यांचे निर्णय हेच अंतिम आहेत. मात्र, पूजाच्या या एका निर्णयामुळे तिच्या वडिलांना आज पोलीस ठाण्याच्या पायऱ्या चढाव्या लागत आहेत, हे विसरून चालणार नाही. ही घटना केवळ एक बातमी नाही, तर ग्रामीण भागातील बदलत्या मानसिकतेचा इशारा आहे.