शाब्बास तांबे साहेब! साठ कोटींचा मुद्देमाल केला हस्तगत!

सुभाष मोहिते
बुलढाणा,(प्रतिनिधी) : निडर,निस्वार्थ,कर्तव्यदक्ष तथा निस्पृह न्यायदानात अल्पावधीतच ख्याती प्राप्त करणारे आयपीएस नीलेश तांबे यांची बातच काही और आहे. कार्यालयीन खर्च स्वतःच्या खिशातून करणारा हा अधिकारी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या प्रशासनातील इमानदारीने चकाकणारा “काजवा” आहे. त्यांनी केवळ प्रशासकीय वर्तुळातच शिस्त लावली नाही,तर कायदा व सुव्यवस्था राखत गुन्हेगारांच्या मुसक्या देखील आवळल्या. त्यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात बुलढाणा पोलीस दलाने २०२५ या वर्षात ऐतिहासिक कामगिरी बजावत तब्बल ५९ कोटी ७३ लाख १७ हजार २८८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सोबतच गंभीर गुन्ह्यात १० टक्के घट बघायला मिळाली असून गुन्ह्याच्या उलगडीचे प्रमाणही ८० टक्क्यांवर जाऊन पोहोचले.त्यामुळे “शाब्बास तांबे साहेब!” अशी कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर जिल्हावासियांनी दिली नसेल तरच नवल!
      बुलढाणा पोलीस दलाची सूत्रे सांभाळताच या खमक्या अधिकाराने पहिल्या क्राइम मीटिंगमध्ये अवैध धंदे बंदचे कडक आदेश दिले. पोलीस व नागरिकांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासह व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या तरुणांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी “मिशन परिवर्तन” सुरू केले. तर दुसरीकडे गुन्हे घडणारच नाहीत, याचा प्रयत्न करत घडलेल्या गंभीर आणि किचकट गुन्ह्याची यशस्वी उकल करून घेतली. जिल्ह्यात दाखल झालेल्या एकूण खुनाच्या गुन्ह्यात ५६ पैकी ५५ गुन्ह्याची उकल केली. दरोड्याच्या सातही गुन्ह्याचा निकाल लावला. नव्हेतर दरोडा व चोरीच्या १३,६६,४७,०३६, अंमली पदार्थ विरुद्ध १०३ केसेस करत १३.६५ कोटी, अवैध गौण खनिजच्या १३३ केसेस करून १३.०१ कोटी, तर ७ कोटी ०५ लाख ५४ हजार ५३६ रुपयांचा गुटखा जप्त केला. सोबतच ५३३ मोबाइल (किंमत ६३.९६ लाख) जप्त करून मूळ मालकांना परत दिले. नियमांची पायमल्ली करणाऱ्या १ लाख १३ हजार ६९ वाहनधारकांना धडा शिकवत ५.३१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. १५ गावठी पिस्तूल आणि ९१ तलवारींसह मोठा शस्त्रसाठा, असा एकूण ५९ कोटी ७३ लाख१७ हजार २८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्या मार्गदर्शनात हस्तगत करण्यात आलेल्या २६.४९ कोटींच्या मुद्देमालाचाही समावेश आहे,हे विशेष!
अंमली पदार्थांवर खाकीचा “प्रहार” 
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘मिशन परिवर्तन’ या नाविन्यपूर्ण मोहिमेने अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले. या मोहिमेतून पोलिसांनी गांजा आणि एमडी ड्रग्जच्या १०३ केसेस करून ११८ आरोपींना बेड्या ठोकत १३.६५ कोटींचा मुद्देमालही जप्त केला. या कारवाईतील ८०० किलो अंमली पदार्थ अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या उपस्थितीत नागपूर येथे नेऊन नष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे नुसती कारवाईवर न करता पथनाट्य, सायक्लोथॉन, क्रिकेटच्या स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांमध्ये जनजागृती केली.
वर्षे ठरले दंगलीमुक्त
२०२४ मध्ये जिल्ह्यात १० दंगलीच्या घटना घडल्याचे दिसून आले. मात्र, २०२५ मध्ये पोलिसांच्या चोख पोलीस नियोजनामुळे आणि गुन्हेगारांमध्ये निर्माण झालेल्या धाकामुळे जिल्ह्यात एकही दंगल घडली नाही.नगरपालिका निवडणुका, व्हीव्हीआयपी दौरे आणि सर्वच सण-उत्सव देखील शांततेत पार पडले.
सायबर सेलची कामगिरी
बुलढाणा पोलिसांच्या सायबर सेलने देखील नागरिकांची फसवणूक टाळत २८.६६ लाख रुपये परत मिळवून दिले. यामध्ये एका नागरिकाला ‘डिजिटल अरेस्ट’च्या धमकीतून मुक्त करून केले आणि त्याचे १० लाख रुपये देखील वाचवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!