अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): समाजात गुरु-शिष्याचे नाते पवित्र मानले जाते, मात्र मेहकरमध्ये एका शिक्षकाने आपल्याच वरिष्ठांना (मुख्याध्यापकांना) दिलेल्या अश्लील वागणुकीमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. “मला निलंबित करण्याचा अधिकार तुला कोणी दिला?” असा जाब विचारत एका निलंबित शिक्षकाने दारूच्या नशेत मुख्याध्यापकांच्या घरासमोर जाऊन अत्यंत खालच्या पातळीवर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी उत्तम वामन खोडके (वय ५२ वर्षे), हे चिंचोली बोरे येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. आरोपी शिक्षक दामोदर प्रभाकर अंभोरे याला त्याच्या वर्तणुकीमुळे गटविकास अधिकारी, पंचायत समिती मेहकर यांनी सेवेतून निलंबित केले होते. याचा राग मनात धरून आरोपीने हा राडा घातला.
दारूच्या नशेत अश्लील शिवीगाळ आणि धमकी
२ एप्रिल रोजी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास आरोपी दामोदर अंभोरे आपल्या दुचाकीने एमएच-२८-बीयु-३०८७ ने मुख्याध्यापक खोडके यांच्या संभाजी नगर येथील घरासमोर पोहोचला. दारूच्या नशेत धुंद असलेल्या आरोपीने भररस्त्यात ओरडून, “ये उत्तम्या… तुला काय अधिकार आहे मला निलंबित करायचा? तुला मी पाहून घेईन,” अशी धमकी दिली. मुख्याध्यापकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की, निलंबन आदेश बी.डी.ओ. साहेबांनी दिले आहेत, त्यांनी फक्त ‘रिलिव्ह ऑर्डर’ दिली आहे. मात्र, संतापलेल्या आरोपीने अत्यंत अश्लील आणि घाणेरडी शिवीगाळ सुरूच ठेवली.
मुख्याध्यापक खोडके यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मेहकर पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ३५१(२) सह कलम ८५(१) मदाका अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार सुखदेव ठाकरे हे करीत आहेत. शिक्षण क्षेत्रातील एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन आणि अश्लील वर्तन केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.