बुलढाणा,(प्रतिनिधी): आपल्या कर्तृत्वाने केवळ स्वतःचेच नव्हे, तर बुलढाणा शहराचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्यासाठी “संवेदना चॅरिटेबल संस्था” आणि “युगप्रवर्तक समतावादी विचार न्याय मंच” यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला “रौनक-ए-शान बुलढाणा” पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विष्णू धंदर यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते “रौनक-ए-शान बुलढाणा” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या सन्मानामुळे डोमरुळसह धाड परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
कर्तृत्वाचा गौरव आणि सामाजिक बांधिलकी मानवसेवा, क्रीडा, पर्यावरण संवर्धन आणि विज्ञान अशा विविध क्षेत्रांत मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये आर्चरी, मॅरेथॉन, वेटलिफ्टिंग आणि समुद्र मॅरेथॉनमध्ये विक्रम प्रस्थापित करणारे खेळाडू, वृक्षारोपण, संवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्राणांची बाजी लावून काम करणारे कार्यकर्ते, विज्ञान प्रदर्शनीमध्ये यश मिळवणारे विद्यार्थी, अशा शूरवीरांच्या आणि गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याच्या उद्देशाने ॲड.प्रवीण सुरडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ भाजप नेते गोकुळ शर्मा तर प्रमुख उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते संजय राठोड, बुलढाणा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.विजय सावळे, नगर पालिका सदस्य विनोद बेंडवाल आणि शिवसेना (उबाठा) प्रदेश प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, ॲड.सानप, नगर पालिकेचे उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, अनिल वर्मा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.
सोहळ्याच्या यशस्वितेसाठी संवेदना चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.प्रवीण सुरडकर, ॲड.गुणवंत नाटेकर, ॲड. धिरज गोठी, ॲड. मदन मगर, ॲड. अमर भालेराव, ॲड. राहुल शिंदे, ॲड. राहुल मोरे आणि संस्थेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.