शेगाव एसटी आगारात राडा! ऑन ड्युटी कर्मचाऱ्याला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

अजय टप

शेगाव,(प्रतिनिधी): पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव शहरात सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या शेगाव आगारात कर्तव्यावर असलेल्या एका कर्मचाऱ्याला त्याच विभागातील अन्य दोन चालकांनी बेदम मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एसटी महामंडळाच्या वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

रोकडिया नगर (शेगाव) येथील असलेले प्रमोद गणपतराव पोहरे हे शेगाव आगारात स्वच्छता विभागात कार्यरत आहेत. ३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास पोहरे हे अळसना रोडवरील एसटी वर्कशॉपमध्ये आपली अधिकृत ड्युटी बजावत होते. याच वेळी आरोपी चालक राजेश बिटाळे आणि सचिन गणेशराव सनगाळे यांनी तिथे येऊन फिर्यादीशी वाद घातला. हा वाद केवळ शाब्दिक राहिला नाही, तर त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. दोन्ही आरोपींनी संगनमत करून पोहरे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता “तुला बघून घेतो, तुला दाखवतोच, अशा शब्दांत धमकी देत मारहाण केली. सरकारी कामात असताना अशा प्रकारे कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याने आगारातील इतर कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेनंतर काही दिवसांच्या विलंबाने, म्हणजेच ८ एप्रिल २०२६ रोजी रात्री १०.४५ वाजता या प्रकरणी अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली. शेगाव शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, ११५(२), ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास संजय करुटले हे करीत आहेत.

प्रशासनाकडून कडक कारवाईची अपेक्षा

एसटी महामंडळ हे जनतेच्या सेवेसाठी आहे, मात्र अंतर्गत वादातून कर्मचाऱ्यांनीच एकमेकांवर हात उचलणे हे निंदनीय आहे. अशा गुंडप्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांमुळे विभागाची प्रतिमा मलीन होत आहे. आता पोलीस या दोन्ही आरोपींना कधी बेड्या ठोकतात आणि महामंडळ त्यांच्यावर काय प्रशासकीय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!