सुभाष मोहिते
बुलढाणा: ज्या काळात वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक यंत्रणा नव्हती, फक्त नाडी बघून आणि स्टेथॅस्कोपच्या सहाय्याने अचूक निदान करण्याचा ‘हातखंडा’ ज्यांच्याकडे होता, असे धाडचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ. सय्यद बशीर आज अनंतात विलीन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण बुलडाणा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
डॉ. बशीर केवळ एक शासकीय अधिकारी नव्हते, तर ते गोरगरिबांचे कैवारी होते. पाडळी आणि धाड प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देताना, जेव्हा रुग्ण बैलगाडीतून मैलोन्मैल प्रवास करून उपचारासाठी यायचे, तेव्हा त्यांचे डोळे पाणावायचे. पावसात, अंधारात हातात कंदील घेऊन पायपीट करत रुग्णांच्या घरापर्यंत पोहोचणारा हा ‘देवदूत’ आजही जुन्या पिढीच्या स्मरणात आहे. त्यांच्या दातृत्वाची महती सांगायची तर, आजच्या काळात ५ ते ६ कोटी रुपये किंमत असलेली आपली तीन एकर जमीन त्यांनी धाड येथील ग्रामीण रुग्णालयासाठी दान केली. आज तिथे उभ्या असलेल्या भव्य वास्तूतून हजारो रुग्णांना जीवदान मिळत आहे, हे त्यांच्याच त्यागाचे फळ आहे.
वयाच्या ९० व्या वर्षापर्यंत रुग्णसेवा अखंड सुरू ठेवणारे डॉ. बशीर गेल्या काही काळापासून छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या मुलीकडे वास्तव्यास होते. तिथेच अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. ९२ वर्षांच्या या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी जात, पात, धर्म आणि श्रीमंती-गरिबीचा भेदभाव कधीच केला नाही.अशा या निष्काम कर्मयोग्यास आणि दानशूर व्यक्तिमत्त्वास टीम हिंदवार्ता आणि संपूर्ण बुलडाणा जिल्ह्याचा मानाचा मुजरा!
- “माणूस जातो, पण त्याचं कार्य आणि त्याने दिलेला माणुसकीचा ओलावा पिढ्यानपिढ्या जिवंत राहतो.”
नसबंदी शस्त्रक्रियेतील ‘धन्वंतरी’
डॉ. बशीर यांची ख्याती केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर प्रशासकीय पातळीवरही मोठी होती. २० वर्षे सेवा दिल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता, परंतु त्यांच्या कौशल्याची गरज ओळखून जिल्हा प्रशासनाने त्यांना पुन्हा ‘मानद मेडिकल ऑफिसर’ म्हणून पाचारण केले. नागपूर येथे विशेष प्रशिक्षण घेतलेले ते एक निष्णात सर्जन होते. संपूर्ण जिल्ह्यात जळगाव जामोदपासून ते शेगावपर्यंत नसबंदी शिबिरांसाठी त्यांची विशेष नियुक्ती असायची. अवघ्या २ ते ३ मिनिटांत यशस्वी शस्त्रक्रिया करण्याचे त्यांचे कौशल्य अचूक होते.