अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): तालुक्यातील गवंढाळा येथे एका २५ वर्षीय विवाहितेसमोर आरोपी तरुणाने भरदिवसा नग्न होऊन अश्लील हावभाव केल्याची संतापजनक आणि तेवढीच धक्कादायक घटना नुकतीच समोर आली. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी नराधम आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गवंढाळा (ता.खामगाव) येथील २५ वर्षीय पीडित महिला ८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास गावातीलच सहदेव इंगळे यांच्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी आरोपी अनिकेत श्रीकृष्ण इंगळे उर्फ सोन्या हा विहिरीजवळ असलेल्या घरात उपस्थित होता. पीडिता पाणी भरत असताना आरोपीने घराच्या दारात उभे राहून अंगावरील कपडे काढले आणि नग्न होऊन पीडितेच्या दिशेने अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. आरोपीच्या या लज्जास्पद कृत्यामुळे पीडित महिला प्रचंड घाबरली. तिने प्रसंगावधान राखून तेथून पळ काढला आणि घरी जाऊन आपल्या सासूला सर्व हकीकत सांगितली.
याप्रकरणी पीडित महिलेने हिवरखेड पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अनिकेत इंगळे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार प्रविण जाधव हे करीत आहेत.