“सदा विजय रॅली”ने पेरली देशभक्तीची ठिणगी!

धाड,(प्रतिनिधी): फेब्रुवारीचा तो गुलाबी थंडीचा महिना, पण धाडनगरीच्या ऐतिहासिक मातीत गुरुवाच्या सायंकाळी एक वेगळीच उष्णता जाणवली. ही उष्णता होती ओसंडून वाहणाऱ्या “देशभक्तीची”. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या “बॉम्बे इंजिनिअर ग्रुप”च्या निधड्या जवानांची “सदा विजय” रॅली जेव्हा धाडच्या पवित्र वेशीवर पोहोचली, तेव्हा गावकऱ्यांनी केलेले जंगी स्वागत पाहून उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. रक्तामध्ये संचारलेली देशसेवा आणि डोळ्यांत माणुसकीची ओढ घेऊन निघालेल्या या वीर पुत्रांचे धाडनगरीत जंगी स्वागत करण्यात आले.
५ फेब्रुवारीच्या सायंकाळी धाडमध्ये जवानांच्या बुलेटचा आवाज घुमला आणि भारतीय सैन्य दलातील निवृत्त जवान गणेश सरोदे कुटुंबीयांसह अवघं गाव रस्त्यावर उतरलं. डीजेवर वाजणारी “आरंभ है प्रचंड” आणि “ए वतन वतन मेरे” सारखी देशभक्तीपर गीते, हवेत फडकणारा तिरंगा आणि जवानांच्या चेहऱ्यावरील ते शिवतेज पाहून धाडची अवघी तरुणाई भारावून गेली. सरोदे निवासस्थानी मुक्कामानंतर ६ फेब्रुवारीची सकाळ अधिकच प्रेरणादायी ठरली. सूर्योदयासोबतच हे जवान छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमले. ज्या राजाने अठरापगड जातींना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले, त्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे या जवानांनी विधीवत पूजन केले. जेव्हा जवानांनी पुतळ्यासमोर उभे राहून “महाआरती” सुरू केली, तेव्हा संपूर्ण वातावरणात एक चैतन्य निर्माण झाले. “भारत माता की जय”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”च्या गगनभेदी जयघोषात झालेली ती आरती पाहून प्रत्येक नागरिकाचा ऊर अभिमानाने भरून आला. जवानांच्या हातातील आरती आणि त्यांच्या नजरेतील निष्ठा पाहून अनेकांचे डोळे पाणावले. जेव्हा सीमेवरील जवान आणि गावची तरुणाई एकत्र थिरकली, तेव्हा “भारत माता की जय”च्या घोषणांनी आभाळ ठेंगणे झाले. यावेळी सीमेवरचा कडाका आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान एकाच ठिकाणी एकवटल्याचा भास झाला. या जवानांना धाडवसियांनी दिलेला निरोप अत्यंत भावूक ठरला. “पुन्हा या…” अशा साद घालत गावकऱ्यांनी या वीरांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. आज ८ फेब्रुवारीला नागपूर येथे या मोहिमेचा समारोप करण्यात आला असला, तरी धाडच्या मातीत जवानांनी पेरलेली ही देशभक्तीची ठिणगी अनेक वर्षे धगधगत राहणार आहे, एवढे मात्र खरे!
पोलीस स्टेशन आणि शाळेत जवानांचा सन्मान
शिवरायांना अभिवादन केल्यानंतर, या वीर पथकाचा धाड पोलीस स्टेशनमध्ये विशेष सत्कार करण्यात आला. वर्दीतील दोन रक्षक—एक देशाचे रक्षण करणारे आणि दुसरे राज्याचे—जेव्हा एकत्र आले, तेव्हा शिस्तीचा एक आगळावेगळा संगम पाहायला मिळाला. त्यानंतर रॅली मराठी प्राथमिक शाळेत पोहोचली. तिथल्या चिमुरड्यांनी या जवानांना पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यांतील चमक भविष्यातील सैनिक याच मातीतून घडणार असल्याची साक्ष देत होती. यावेळी जवानांनी मुलांशी संवाद साधला, त्यांना देशसेवेचे महत्त्व सांगितले आणि तिथून ही रॅली पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.
साडेसहा हजार किमीची “मैत्री” आणि “कर्तव्य” 
४ बुलेट आणि १ जीप असलेली ही केवळ एक रॅली नव्हती, तर निवृत्त सैनिकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे एक माध्यम ठरले. आपल्या निवृत्त सहकाऱ्यांचे प्रश्न मुख्यालयापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प घेऊन पुण्याहून निघालेल्या या रॅलीने बीड, जालना मार्गे विदर्भाकडे एन्ट्री केली. पेन्शनचे प्रश्न असोत, जमिनीचे वाद असोत की शहीद कुटुंबांच्या अडचणी, हे जवान प्रत्येक माजी सैनिकाच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या एकूण घेत आहेत.
शहीद जवानाच्या मातेचे घेतले दर्शन
ही रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्प अर्पण केले. उपस्थितांना देशसेवेची जाणीव करून दिली. यावेळी प्रत्येकाच्या अंगात देशाभिमान जागी होत उत्साह संचारल्याचे दिसून आले. त्यानंतर ही रॅली शहीद जवान कृष्णा बोर्डे यांच्या घरी पोहोचली. रॅलीत सहभागी जवानांनी शहिद कृष्णा बोर्डे यांच्या आईचे दर्शन घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!