अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महिला व तरुणी बेपत्ता होण्याचे सत्र अविरतपणे सुरू आहे. आता वय वर्ष ३५ असलेली महिला ही आपल्या अवघ्या सात वर्षीय वयाच्या चिमुकलीसह बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना सोनाळा (ता.संग्रामपूर) येथे समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मायलेकी प्रकरणात सोनाळा पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पोलीस प्रशासनाकडून त्यांचा शोध सुरू आहे.
गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील ३३ पोलीस स्टेशन हद्दीतून महिला व तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातील काही तरुणी कुटुंबीयांच्या हातावर तुरी देऊन स्वतःहून आपल्या प्रियकरा सोबत पसार झाल्या आहेत. तर, काही अल्पवयीता समज नसल्याने आमिषाला बळी पडून घरातून बाहेर पडल्या आहेत. अविरतपणे सुरू असलेल्या या घटनांमुळे समग्र बुलढाणा जिल्हा चांगलाच हादरून गेला आहे. महिला व तरुणींची बेपत्ता होण्याची मालिका सुरू असतानाच आदिवासी बहुल भागात येणाऱ्या सोनाळा येथून अवघ्या सात वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याने पोटी आणि पाठी बहिणी असलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोनाळा येथील रहिवासी असलेल्या राजकन्या निरंजन वानखडे (वय ५२ वर्षे) यांची सून पुनम राहुल वानखडे ( वय ३५ वर्षे) उंची ५ फुट रंग गोरा, चेहरा गोल, केस साधारण, पांढऱ्या रंगाचा ड्रेस, निळ्या रंगाची ओढणी घातलेली असून मुलगी प्रणीता राहुल वानखडे (वय ७ वर्षे) हिला सोबत घेऊन १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास बँकेचे काम आहे, असे सांगून घरून निघाली होती. मात्र, उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, प्रणीताचा पत्ता लागला नाही. दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी राजकन्या वानखडे यांनी सोनाळा पोलिसांचा दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हरवल्याची नोंद घेतली आहे. प्रणीता राहुल वानखडे हिची उंची ४ फूट, रंग: गोरा, चेहरा गोल, बॉब कट केलेले केस, आणि तिने अंगात निळ्या रंगाचा डिझाइनर फ्रॉक, पायात सँडल घातलेली आहे. उपरोक्त वर्णनाची महिला आणि चिमुकली आढळून आल्यास संबंधितांनी सोनाळा पोलिसांसोबत संपर्क साधावा असे आवाहन तपास अधिकारी पोलीस अंमलदार रमेश खरात यांनी केले आहे.
कावळा येथूनही युवती बेपत्ता
चिखली तालुका येणाऱ्या कावळा येथील रहिवासी असलेले संजय विठ्ठल साठे (वय ४५ वर्षे) यांची मुलगी साधना संजय साठे (वय १८ वर्षे) हे इयत्ता बारावीचे शिक्षण घेत असून तिचे सध्या पेपर सुरू आहे. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता साधना ही अमडापूर येथे पेपर देण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. रात्री उशिरापर्यंत ती घरी परतलीच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. त्यामुळे संजय साठे यांनी चिखली पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार भगवान शेवाळे हे करीत आहेत. साधनाचा रंग गोरा, उंची ५ फुट, शरीर बांधा मजबुत, केस लांब, अंगात पांढरा रंगाचां टॉप व लॅगिज, त्यावर भगव्या रंगाची ओडणी घातली असून पायात लाल रंगाची सॅंडल घातलेली आहे. उपरोक्त वर्णनाची युवती आढळून आल्यास चिखली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.