अजय टप
सिंदखेड राजा,(प्रतिनिधी): राज्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतानाच, या हतबलतेचा गैरफायदा घेणाऱ्या ठगांचे पेव फुटले आहे. रेल्वे विभागात कायमस्वरूपी सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका ग्रामीण कुटुंबाची तब्बल ९ लाख रुपयांनी लूट केल्याची धक्कादायक घटना सिंदखेड राजा तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रदीर्घ चौकशीनंतर सिंदखेड राजा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, संपूर्ण तालुक्यात या घटनेने खळबळ उडाली आहे.
ग्रामीण भागातील तरुणांना रेल्वे किंवा इतर सरकारी विभागांत नोकरी मिळवणे हे एक मोठे स्वप्न असते. याच स्वप्नाचा बाजार मांडण्याचे काम आरोपी अमोल अशोक खंडाळे (रा. घाणेवाडी, ता. जि. जालना, ह.मु. सिंदखेड राजा) याने केले. फिर्यादी हरिदास एकनाथ जाधव (रा. जळगाव पिंपळगाव, ता. सिंदखेड राजा) यांच्या मुलाला आणि त्यांच्या ओळखीच्या इतर मुलांना रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देण्याची हमी आरोपीने दिली होती.
नोकरीसाठी “वरपर्यंत वशिला” लावावा लागेल आणि त्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आपल्या मुलाचे भविष्य उज्ज्वल होईल या आशेने जाधव यांनी कष्टाची पुंजी आणि उसनेवारी करून ९ लाख रुपये आरोपीच्या स्वाधीन केले. मात्र, महिने उलटले तरी ना नोकरीचे नियुक्ती पत्र आले, ना दिलेले पैसे परत मिळाले. आरोपी अमोल खंडाळे हा टाळाटाळ करू लागला, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे जाधव यांच्या लक्षात आले. त्यांनी हार न मानता १६ सप्टेंबर २०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय (बुलडाणा) येथे धाव घेऊन लेखी तक्रार अर्जाद्वारे आपबिती मांडली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सदर अर्जाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी (देऊळगाव राजा) यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान फिर्यादीने दिलेले पुरावे आणि आरोपीची संशयास्पद वर्तणूक यामुळे हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. तब्बल सहा ते सात महिने चाललेल्या या सखोल चौकशीनंतर, पोलीस अधीक्षक कार्यालयाने १ एप्रिल २०२६ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची रीतसर परवानगी दिल्याने
८ एप्रिल २०२६ रोजी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताच्या कलम ३१८(४), ३१८(२), ३१९(२), ३३६ व ३४० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि हेमंत शिंदे हे करीत आहेत. या गुन्ह्यात आरोपीने अजून किती जणांना लुबाडले आहे? यामागे एखादे मोठे रॅकेट कार्यरत आहे का? आणि घेतलेल्या पैशांची विल्हेवाट कशी लावली? या दिशेने पोलीस आता सखोल तपास करत आहेत.
तरुणांनो आणि पालकांनो सावध राहा!
हा प्रकार केवळ एका हरिदास जाधव यांच्यापुरता मर्यादित नसून, अनेक गरजू तरुण अशा फसवणुकीला बळी पडत आहेत. सरकारी नोकरी ही केवळ गुणवत्तेवर आणि अधिकृत परीक्षेच्या माध्यमातूनच मिळते. कोणत्याही व्यक्तीला पैसे देऊन नोकरी मिळत नाही, हे सत्य समाजाने स्वीकारणे गरजेचे आहे.