सैलानी: महावितरणच्या ‘भरारी पथका’चा मोठा दणका

सैलानी, (प्रतिनिधी): बुलढाणा-सैलानी रोडवरील एका नामांकित वाईन बारमध्ये सुरू असलेला वीजचोरीचा धक्कादायक प्रकार महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणला आहे. तब्बल ११ हजार २१४ युनिट्सची म्हणजेच २ लाख ६० हजार ३६० रुपयांची चोरी केल्याप्रकरणी जागा मालक आणि वीज वापरकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईने बुलढाणा शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. नव्हेतर बुलढाणा शहर आणि परिसरात वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.

सैलानी रोडवरील रायपूर परिसरात ‘साक्षी वाईन बार अँड रेस्टॉरंट’ (घर क्रमांक ३३९/३२५) येथे व्यावसायिक वीज कनेक्शनमध्ये फेरफार होत असल्याची शंका महावितरणच्या भरारी पथकाला होती. या माहितीच्या आधारावर यवतमाळ येथील भरारी पथकाचे प्रभारी कार्यकारी अभियंता गजानन पांडुरंग सानप यांनी आपल्या सहकाऱ्यांसह १३ मार्च २०२६ रोजी दुपारी १.२० वाजता या ठिकाणी धाड टाकली. भरारी पथकाने मीटरची तपासणी केली असता, अधिकारीही चक्रावून गेले. वीज मीटरमध्ये अत्यंत शिताफीने फेरफार करण्यात आला होता. मीटरच्या डिस्प्लेवर ‘VC-Open’ (दि.२७/०४/२४) असा मेसेज दिसत होता. मीटरच्या बॉडीवर महावितरणचे कोणतेही अधिकृत सील मिळून आले नाही. मीटरमधील PCB (प्रिंटेड सर्किट बोर्ड) जो शंट डिव्हायडरला जोडलेला असतो, तो जाणीवपूर्वक तोडण्यात आला होता. यामुळे मीटर ‘पल्स’ मारत नव्हते, परिणामी वीज वापर सुरू असूनही मीटरमध्ये रिडींग वाढत नसल्याचे तपासणीत दिसून आले.

या प्रकरणी भरारी पथकाने जागा मालक सुभाष भिकाजी चिंचोले आणि वीज वापरकर्ते प्रकाश रामभाऊ खंडागळे यांच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांत गजानन सानप यांच्या तक्रारीवरून विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपद पोलीस अंमलदार रवींद्र हजारे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!