सोशल मीडियावरील ‘त्या’ व्हायरल मेसेजमागचं धक्कादायक सत्य!

नवी दिल्ली,(प्रतिनिधी) : गेल्या ४८ तासांपासून तुमच्या व्हॉट्सॲप आणि फेसबुक फीडवर एक मेसेज वेगाने फिरतोय. “इस्रायल-इराण युद्धामुळे भारताचा तेल पुरवठा ठप्प होणार असून पुढच्या आठवड्यापासून पेट्रोल पंप बंद होतील. तसेच सरकार पेट्रोल गाड्यांवर कायमची बंदी घालणार आहे.” या एका मेसेजमुळे काल रात्रीपासून अनेक शहरांतील पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. पण, या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? की हा केवळ जनतेला घाबरवण्याचा एक कट आहे? आम्ही या विषयाचा मुळापासून तपास केला असून काय आहे या मागील सत्य चला तर मग जाणून घेऊयात.
पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि इस्रायल-इराण यांच्यातील संघर्ष हे जागतिक चिंतेचे विषय नक्कीच आहेत. मात्र, या युद्धाचा आधार घेऊन काही खोडसाळ प्रवृत्तींनी “भारताचा तेल साठा संपणार” अशा वावड्या उठवल्या आहेत. दिल्ली, मुंबई आणि पुण्यासारख्या मेट्रो शहरांमध्येच नाहीतर ग्रामीण भागातही “उद्यापासून पेट्रोल मिळणार नाही” अशा अफवा पसरल्याने लोकांनी कॅन आणि बाटल्या घेऊन पंप गाठले. मात्र, पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भीती पूर्णपणे निराधार असल्याचे सांगितले आहे.
कोणत्याही संकटासाठी आधीच तयार असतो. भारताकडे जमिनीखाली प्रचंड मोठे ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ म्हणजेच धोरणात्मक तेल साठे आहेत. विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पाडूर यांसारख्या ठिकाणी असलेल्या या भूमिगत गुहांमध्ये इतका तेलसाठा आहे की, जरी जगातून कच्च्या तेलाचा पुरवठा काही काळासाठी थांबला, तरी भारताचे चक्र थांबणार नाही.
शिवाय, भारत आता केवळ आखाती देशांवर अवलंबून राहिलेला नाही. भारताने रशिया, अमेरिका आणि आफ्रिकन देशांकडून तेल आयातीचे नवे मार्ग खुले केले आहेत. त्यामुळे “पुरवठा खंडित होईल” हा दावा तांत्रिकदृष्ट्या चुकीचा ठरत आहे.
व्हायरल मेसेजमधील दुसरा दावा म्हणजे “पेट्रोल गाड्यांवर सरसकट बंदी”. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने यापूर्वीच भारताचे लक्ष्य ‘इंधन परिवर्तन’ आहे, ‘इंधन बंदी’ नाही, हे आधीच स्पष्ट केले आहे. सरकार १५ वर्षांहून जुन्या सरकारी गाड्या आणि जुन्या खासगी गाड्या मोडीत काढण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. याचा अर्थ सर्व पेट्रोल गाड्या बंद होणार असा मुळीच होत नाही. भारत आता २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलकडे वळला आहे. भविष्यात आपल्या सध्याच्या पेट्रोल गाड्या अधिक पर्यावरणपूरक इंधनावर चालणार असल्याने त्या मुळीच बंद होणार नाही, हे तेवढेच सत्य आहे. सोबतच देशात ई-वाहनांची संख्या वाढत असली तरी, पेट्रोल इंजिन पूर्णपणे हद्दपार व्हायला किमान पुढची दोन दशके लागतील, असे ऑटोमोबाईल तज्ज्ञांचे मत आहे.
भारताची अर्थव्यवस्था आज जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे आणि आपली ऊर्जा सुरक्षा अत्यंत भक्कम आहे. इस्रायल-इराण संघर्षाचे पडसाद जागतिक राजकारणावर पडतील, पण भारतातील पेट्रोल पंप बंद होण्याचे किंवा पेट्रोल गाड्यांवर बंदी येण्याचे कोणतेही चिन्ह नाही. त्यामुळे सुज्ञ नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
किंमतीवर होऊ शकतो परिणाम
युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल काही डॉलर्सनी वाढू शकतात. मात्र, भारताकडे असलेल्या दीर्घकालीन करारांमुळे सामान्य ग्राहकांवर याचा तात्काळ परिणाम होणार नाही. सरकारकडे किमती नियंत्रित ठेवण्यासाठी ‘प्राईस स्टॅबिलायझेशन फंड’ असतो, ज्याचा वापर अशा आणीबाणीच्या काळात केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!