मलकापूर,(प्रतिनिधी): राजकारणात सत्तेची ऊब असली की अनेकांना जमिनीवरचे पाय हवेत तरंगल्याचा भास होतो. मात्र, मलकापूरच्या चाळीसबिघा परिसरात एका ‘तगड्या’ सत्ताधारी पदाधिकाऱ्याला चक्क जमिनीचे भान करून देण्यात आले. हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर, भरदिवसा या महाशयांना घरमालकाने दिलेला ‘प्रसाद’ सध्या संपूर्ण शहरात खमंग चर्चेचा विषय ठरत आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रापासून राज्यापर्यंत आणि स्थानिक पातळीवरही आपल्या पक्षाचा ‘झेंडा’ उंचावणारे हे पदाधिकारी महाशय एका नागरिकाच्या जागेवर अनधिकृतपणे ‘तंबू’ ठोकून बसले होते. “१ मे पर्यंत जागा खाली करतो,” असे आश्वासन देऊन त्यांनी वेळ मारून नेली. मात्र, कॅलेंडरची पाने उलटली तरी साहेबांचा पाय काही निघेना! सत्तेच्या बळावर दुसऱ्याची जागा हडपण्याचा हा प्रयत्न घरमालकाच्या संयमाचा अंत पाहणारा ठरला.
हनुमान जयंतीलाच ‘रुद्र’ अवतार!
नेहमीप्रमाणे सत्तेचा रुबाब दाखवत जागा खाली करण्यास टाळाटाळ करणाऱ्या या पदाधिकाऱ्याला घरमालकाने यावेळी गाठलेच. शब्दाने शब्द वाढला आणि वादाचे रूपांतर थेट ‘हिशोब’ चुकता करण्यात झाले. भर दुपारी, लोकांच्या साक्षीने या पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावत त्याला चांगलाच चोप देण्यात आल्याचे समजते. सत्तेच्या बळावर मनमानी करणाऱ्या या चेहऱ्याचे तोंड अखेर जागेच्या वादावरून ‘लाल’ झाले, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
तो ‘चेहरा’ नेमका कोण?
या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच कुजबुज सुरू आहे— तो ‘शक्तिशाली’ पदाधिकारी नेमका कोण? ज्याने सत्तेच्या जोरावर सामान्यांना त्रास दिला, पण अखेर त्याला भररस्त्यात धडा शिकवण्यात आला. ‘कारनाम्यांची मालिका’ पाठीशी असलेल्या या महाशयांची इज्जत आता चाळीसबिघा परिसरात वेशीवर टांगली गेली आहे.
सत्तेची ताकद दाखवणाऱ्या या पदाधिकाऱ्याचा ‘तंबू’ आता उखडला जाणार की आणखी काही नवे नाट्य घडणार? याकडे संपूर्ण मलकापूरचे लक्ष लागले आहे. दरम्यान, “अति तिथे माती” या म्हणीचा प्रत्यय या निमित्ताने शहराला आल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उमटत आहे.