चिखली,(प्रतिनिधी): चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हातणी येथील एका ४० वर्षीय महिलेने झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना नुकतीच समोर आली. याप्रकरणी चिखली पोलिसांत मर्ग दाखल करण्यात आला आहे.
हातणी (ता.चिखली) येथील रहिवासी असलेली रेणुका विजय नरवाडे (वय ४० वर्षे) या महिलेने आपल्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीने साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह खाली काढून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला.
या प्रकरणी मृत महिलेचे चुलत भाऊ ऋषिकेश मधुकर मोरे (वय २८ वर्षे) यांनी चिखली पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार अनिल वाघ करीत आहेत. या घटनेमुळे हातणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रेणुका नरवाडे यांनी आत्महत्या का केली?, याचे कारण समजू शकले नाही.