हिवरा नाईक येथे किरकोळ वादातून हाणामारी

चिखली,(प्रतिनिधी): जागेच्या वादातून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन एका कुटुंबाला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना चिखली तालुक्यातील हिवरा नाईक येथे घडली आहे. या प्रकरणी अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिवरा नाईक येथील रहिवासी फिर्यादी बाळू दशरथ ढंगारी (वय ३६ वर्षे) यांचा भाऊ आणि आरोपी यांच्यात जागेचा जुना वाद आहे. या वादातून आरोपी बंडू सुखदेव शिंदे हा फिर्यादीच्या भावाच्या जागेत खड्डे खोदून ‘डिळी’ (खांब) उभे करत होता. आपल्या भावाच्या मालकीच्या जागेत अतिक्रमण होत असल्याचे पाहून बाळू ढंगारी यांनी आरोपीला हटकले आणि “आमच्या भावाच्या जागेत खड्डे खोदू नका,” असे विनंतीवजा सांगितले. मात्र, याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, बंडू शिंदे याच्यासह संदीप बंडू शिंदे, कडूबा सुखदेव शिंदे आणि लक्ष्मण कडूबा शिंदे या सर्वांनी मिळून फिर्यादी बाळू ढंगारी व त्यांच्या नातेवाईकांना घेरले. आरोपींनी हातातील लाठ्या-काठ्या आणि टीकासाच्या दांड्याने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जबर मारहाण केली. केवळ मारहाण करूनच आरोपी थांबले नाहीत, तर त्यांनी फिर्यादीला ‘जीवे मारण्याची’ धमकी देखील दिली.

या घटनेनंतर जखमी अवस्थेत बाळू ढंगारी यांनी अमडापूर पोलीस स्टेशन गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८ (१), ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस अंमलदार वंदना बोर्डे ह्या करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!