२० वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

अजय टप

लोणार,(प्रतिनिधी) : लोणार तालुक्यातील भुमराळा येथे एका २० वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली. याप्रकरणी बिबी पोलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे. वाढत्या आत्महत्या पहिल्या खरच जीवन इतके स्वस्त झाले का?, असा प्रश्न आपुसकच मनाला पडत आहे.

भुमराळा येथील रहिवासी असलेली मृत रोहिणी प्रविण म्हस्के (वय २० वर्षे) ही भुमराळा येथील रहिवासी होती. रोहिणीने आपल्या घरातील लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब निदर्शनास येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय रवाना केला. मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच मृत रोहिणीचे वडील परमेश्वर बाबासाहेब मोरे (रा. बोरखेडी बुद्रुक ता. सिंदखेड राजा) यांना त्यांचे व्याही ब्रम्हानंद म्हस्के यांनी फोनद्वारे मुलीच्या मृत्यूची माहिती दिली. पोटच्या गोळ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याचे समजताच मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

याप्रकरणी परमेश्वर मोरे यांनी बिबी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ अन्वये मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास रविराज चव्हाण हे करीत आहेत. विवाहितेने टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.तरुण विवाहितेच्या मृत्यूने हळहळ

केवळ २० वर्षांच्या रोहिणीचा असा मृत्यू झाल्याने भुमराळा आणि बोरखेडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संसाराची स्वप्ने पाहण्याआधीच एका विवाहितेने मृत्यूला कवटाळल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण काय? यामागे काही कौटुंबिक वाद होता की अन्य काही कारण, याचा शोध आता बिबी पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!