राजकारण

नगर परिषदेत गायकवाडांची ‘राजकीय पूजा’

धनुष्यबाणाची सरशी, तर 'पंजा' आणि 'कमळ' पडले मागे!

बुलढाणा,दि. २१ (प्रतिनिधी) :- आज लागलेल्या निकालात आ.संजय गायकवाड यांच्या एकहाती नेतृत्वात शिवसेना (शिंदे गट) पक्षाने आपली ताकद दाखवून देत विरोधकांची चांगलीच दाणादाण उडवली. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या नगराध्यक्षपदाच्या लढतीत पूजाताई संजय गायकवाड यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे, या विजयाचे समीकरण नावांच्या अनोख्या अर्थाशी जुळून आल्याने शहरात त्याचीच मजेशीर चर्चा रंगली.

निवडणुकीच्या रिंगणात आ. संजय गायकवाड यांच्या अर्धांगिनी तथा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार पूजा गायकवाड, काँग्रेसच्या लक्ष्मी दत्ता काकस आणि भाजपच्या अर्पिता विजय शिंदे यांच्यात चुरस होती. भाजपच्या अर्पिता शिंदे यांनी आपली ताकद निवडणुकीत “अर्पण” केली, पण विजयाचे ‘सौभाग्य’ मिळवण्यासाठी काँग्रेसच्या लक्ष्मी काकस यांनी त्यांना मागे टाकले.मात्र, शेवटी ज्यांच्या नावाचा अर्थच भक्ती आणि यश आहे, त्या पूजाताई संजय गायकवाड यांनी बाजी मारली आणि विजयाची ‘पूजा’ खऱ्या अर्थाने पूर्ण केली!
                                                      शिवसेना शिंदे गटाची ‘एकहाती’ सत्ता
केवळ नगराध्यक्षपदच नव्हे, तर नगरसेवक पदासाठीही शिवसेना शिंदे गटाने ३० पैकी २२ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी (शरद पवार गट) दोन, भारतीय जनता पार्टीच्या दोन, तर दोन अपक्ष उमेदवारांनी याठिकाणी मुसंडी मारली.
                                                       गुलालाची उधळण आणि जल्लोष
काँग्रेसच्या लक्ष्मी काठोकाठ येऊन थांबल्या आणि भाजपच्या अर्पिता स्पर्धेत मागे पडल्या, पण जनतेने मात्र शिवसेना शिंदे गटाच्या ‘पूजा’ताईंच्या गळ्यात विजयाची माळ घातली. या विजयामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शहरात गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!