
मुंबई (प्रतिनिधी)
राज्यभरात नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्षाने घवघवीत यश मिळविले. राज्यभरात तब्बल २६ नगरसेवक निवडून आणत प्रहारने प्रस्थापित राजकारण्यांना मोठा धक्का दिला. निवडणुकीतील यश म्हणजे सर्वसामान्यांच्या संघर्षाचा विजय असल्याची भावना प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे.
प्रहार जनशक्ती पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी, कष्टकरी आणि वंचितांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून लढत आहे. सेवा हाच धर्म मानून “सामान्य माणसाला न्याय” हा एकमेव ध्यास घेऊन बच्चू कडू यांनी शेकडो आंदोलने केली आहेत. मतदारांनी याच आंदोलनांची आणि कार्याची पोचपावतीच या विजयाद्वारे दिली आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामाच्या जोरावर प्रहारने मतदारांच्या मनात अढळ स्थान निर्माण केल्याचे या निकालातून स्पष्ट झाल्याचे बोलल्या जात आहे.
प्रहारने मिळवलेला हा विजय म्हणजे केवळ सत्तेचा आनंद नसून जनतेने टाकलेल्या विश्वासाची ही मोठी जबाबदारी असल्याने विजयी २६ नगरसेवक आता आपल्या प्रभागातील गल्ली-बोळातील प्रश्न सोडवून प्रत्येक कुटुंबाला न्याय देत निश्चितच आपल्या सेवकांची प्रचिती देतील,असा विश्वास व्यक्त होत आहे. तर प्रचाराच्या विजयाचा हा आकडा म्हणजे बदलाची ताकद असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
लढाई अधिक तीव्र
‘न्याय आणि लढा’ ही प्रहार जनशक्ती पक्षाची खरी ओळख आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसामान्यांचा आवाज आता अधिक बुलंद होणार आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात प्रहारचा हा भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्धचा लढा यापुढे अधिक जोमाने लढविणार असल्याचा संकल्प नवनियुक्त नगरसेवकांनी यावेळी बोलून दाखवला.



