स्मार्ट बुलढाणा

वसाडी औषध विल्हेवाटीत आढळल्या त्रुटी

आरोग्य केंद्र प्रकरणाची चौकशी पूर्ण;संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस

संग्रामपूर,(प्रतिनिधी) :
प्राथमिक आरोग्य केंद्र वसाडी येथे मुदतबाह्य नसलेली औषधे जाळल्याचे तसेच वैद्यकीय अधिकारी अनुपस्थिती प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत औषध विल्हेवाटीत त्रुटी आढळल्या असून संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माण अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र वसाडी येथे मुदतबाह्य नसलेली औषधे जाळण्यात आली होती. आरोग्य विभागाच्या वतीने १८ डिसेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र (वसाडी) येथे भेट देऊन सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत प्राथमिक आरोग्य केंद्र (वसाडी) हे मार्च २०२४ पासून कार्यरत असून मंजूर १५ पदांपैकी २ वैद्यकीय अधिकारी कंत्राटी स्वरूपात कार्यरत आहेत व ८ पदे बाह्य स्रोताद्वारे भरलेली आहेत. काही पदे सध्या रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी (सोनाळा) येथे वास्तव्यास असून वसाडी येथे निवासाची सुविधा उपलब्ध नाही. ई-औषधी लॉगिन उपलब्ध नसल्यामुळे औषध पुरवठा प्राथमिक आरोग्य केंद्र (सोनाळा) येथून ऑफलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण ५ हजार ४१७ बाह्यरुग्णांनी उपचार घेतल्याची नोंद चौकशी आढळून आली. तसेच कॅल्शीअम गोळ्या, डेक्सामेटासन, फेरीरिमेन, जेन्ट्यासीन इंजेक्शन तसेच मेट्रानिडेझल सिरप ही औषधे जाळण्यात आल्याचे देखील निदर्शनास आले. सदर औषधांची एकूण किंमत २ हजार ५३२ रुपये असून त्यापैकी फक्त १६० रुपये किंमतीची औषधे मुदतबाह्य होती. उर्वरित औषधांच्या विल्हेवाट प्रकरणी संबंधित औषध निर्माण अधिकाऱ्याकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणी संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माण अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून प्राप्त खुलाशांच्या आधारे पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. औषध विल्हेवाट प्रक्रियेमध्ये त्रुटी व नियंत्रणाचा अभाव आढळून आल्याने संबंधित अधिकाऱ्यांना सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून प्रशासकीय कारवाई सुरू आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!