खबरदार ! अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी द्याल तर?
ठाणेदार गावंडेंचा पालकांना फौजदारी कारवाईचा इशारा

वाढत्या वाहतूकची कोंडी आणि अल्पवयीन मुलांकडून केले जाणारे जीवघेणे स्टंट या गंभीर परिस्थितीची दखल घेत चिखलीचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी आक्रमक झाले असून त्यांनी आता अल्पवयीन पाल्याच्या हातात गाड्या देणाऱ्या पालकांवर फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे.
चिखली शहराच्या मुख्य मार्गांवर आणि गजबजलेल्या भागात अल्पवयीन मुले सुसाट वेगाने दुचाकी चालवत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. शहरातील विविध नामांकित शाळा, महाविद्यालये आणि खासगी शिकवणी वर्गांच्या समोरून ही मुले अतिशय वेगात दुचाक्या पळवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. विशेषत: शाळा सुटण्याच्या वेळी ही मुले रस्त्यावर धुमाकूळ घालतात. ज्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ही बाब गांभीर्याने घेत चिखली पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थी किंवा मुलगा, मुलगी दुचाकी चालवताना आढळून आल्यास केवळ त्याच्यावरच नाही,तर त्याच्या पालकावरही थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे गावंडे यांनी “हिंदवार्ता”शी बोलतांना सांगितले. सोबतच या प्रकरणात कुणाचाही राजकीय किंवा सामाजिक हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिसांना सहकार्य करा
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि महिला व विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण देण्यासाठी चिखली पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पालकांनी आपल्या मुलांच्या हट्टापायी त्यांना वाहने देऊन संकटात टाकू नये आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही गावंडे यांनी केले आहे.
“कॅफे”ही रडारवर
शहरातील काही कॅफेमध्ये गैरप्रकार चालत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे याकडे देखील पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून कॅफेमध्ये काहीही आक्षेपार्ह किंवा गैर आढळल्यास त्यांना खाकीचा इंगा दाखवला जाणार असून हुल्लडबाजी करून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या चिडीमारांनाही आता धडा शिकवण्यात येणार आहे.



