
मलकापूर,(प्रतिनिधी) :
महावितरणच्या उपपविभागीय कार्यालयात सध्या ग्राहकसेवेचा अक्षरश: बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. महावितरणसारख्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या शासकीय यंत्रणेत नियम, वेळापत्रक आणि जबाबदाऱ्यांना हरताळ फासून सहायक अभियंता दीपक बाणबाकोडे हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप वीज ग्राहकांकडून केला जात असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
वीज मीटर व नवीन कनेक्शनसाठी नियमाप्रमाणे १९ डिसेंबर रोजी डिमाण्डनोट भरूनही तब्बल पाच दिवस उलटले तरी अद्याप वीज मीटर मिळाले नाही. पैसे भरूनही वीज कनेक्शन न मिळणे म्हणजे सरळसरळ ग्राहकांची लूट आणि मानसिक छळ असल्याचे दिसून येत आहे.
दररोज कार्यालयात चकरा मारूनही संबंधित सहायक अभियंता उडवाउडवीची उत्तरे देत असून ‘माझे कम्प्युटर आठ दिवसांपासून बंद आहे, ‘वरिष्ठ अधिकारी सहकार्य करत नाहीत’, अशी कारणे सांगून स्वत:ची जबाबदारी झटकण्याचा निर्लज्ज प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे स्वत:च्या निष्क्रियतेवर पांघरूण घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावावर खापर फोडण्याचा प्रतापही खुलेआम सुरू आहे. एकीकडे महावितरण ग्राहकांकडून वेळेवर पैसे वसूल करते, मात्र दुसरीकडे सेवा देताना मात्र आळशीपणा, दिरंगाई आणि मग्रुरी दाखवली जात असल्याचे स्पष्ट चित्र आहे. वीज कनेक्शनअभावी घरगुती कामकाज, व्यवसाय, कार्यालयीन कामे ठप्प झाली असून आर्थिक नुकसानासह मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.



