स्मार्ट बुलढाणा
धाडनगरीतील वाढती रहदारी ठरतेय डोकेदुखी!
मौलाना आझाद चौकात गतिरोधकाची गरज; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघातांचा धोका वाढला

अभिनय बोर्डे
धाड (प्रतिनिधी):
बुलढाणा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या धाडनगरीत वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत आहे. बुलढाणा ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौलाना आझाद चौकात वाहनांच्या प्रचंड वेगामुळे अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरून आहे.
धाडनगरीतील मौलाना आझाद चौक हा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, विठ्ठलवाडी, पुणे आणि मुंबईकडे दिवसाकाठी हजारावर वाहने ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ असते. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग अनियंत्रित असल्याने रस्ता ओलांडताना पादचारी, शाळकरी मुले आणि वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. विशेष म्हणजे हा चौक बाजारपेठ, रिक्षा थांबा आणि निवासी वस्तीच्या जवळ असल्याने येथे नेहमीच गर्दी असते. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता बळावत आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने शास्त्रोक्त गतिरोधक बसवावेत. वाहनधारकांसाठी सूचना फलक व वेगमर्यादेचे फलक लावावेत, आणि वर्दळीच्या वेळी वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांकडून होत आहे.
संबंधित विभागाकडून उडवाउडवीचे उत्तर
या ठिकाणी वाहतुकीला शिस्त लावून गतिरोधक टाकावे, अशी मागणी सबंधित विभागाकडे नागरिकांनी अनेकदा केली. मात्र, “हा राष्ट्रीय महामार्ग आहे” असे तांत्रिक कारण पुढे करून अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकून टाकल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे “एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल आता धाडकर विचारत आहेत.
दुचाकीधारकांनाही शिस्तीची गरज
या चौकात असलेल्या हॉटेल आणि व्यावसायिकांनी दुकाने आधीच रस्त्यापर्यंत आलेली आहेत. त्यातच भर म्हणून या हॉटेल्स आणि प्रतिष्ठानमध्ये येणारे ग्राहक दुकानासमोर आपली वाहने उभी करतात. त्यामुळे अर्धा रस्ता वाहनांच्या पार्किंगमध्ये व्यापला जातो. परिणामी रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना पुरेशी जागा मिळत नाही. अशावेळी वाहनाचा धक्का लागून वादविवाद होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे या ठिकाणी अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या वाहनांना मज्जाव करणे देखील,तितकेच गरजेचे आहे, हे विशेष!



