स्मार्ट बुलढाणा

वरूड फाट्यानजीक कार नदीपात्रात कोसळली!

पुलावरील रेतीवरून घसरून झाला अपघात; तिघे किरकोळ जखमी

मोताळा,(प्रतिनिधी) :
जिल्ह्यात बोकाळलेल्या अवैध रेतीच्या धंद्याने तसेच रेतीमाफियांच्या धुमाकुळामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर रक्ताचा सडा पडला असून कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नव्हेतर अपघातांची मालिका सुरूच आहे. असाच एक अपघात नांदुरा रोडवर असलेल्या वरूड फाट्यावरील पुलावर घडला. या पुलावर पडलेल्या रेतीवरून दोन कार घसरून अपघात झाला. एक कार थेट नदीत कोसळली. सुदैवाने एअरबॅग उघडल्याने चालक बचावला. तर दुसऱ्या कारमधील तीनजण किरकोळ जखमी झाले. २५ डिसेंबरच्या रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास ही घटना घडली.
नांदुरा येथून दोन कार बुलढाणाकडे निघाल्या. सदर कार मोताळा-नांदुरा रोडवरील वरूड फाट्याजवळील पुलावर आल्या. या पुलावर मोठ्या प्रमाणावर रेती पडलेली होती. त्यामुळे एमएच-०४-जीडी-८२४५ क्रमांकाची कार ब्रेक न लागल्याने पुलावरून नदीत कोसळली. एअरबॅग उघडल्याने कारमधील अरुण राजगुरे हे सुदैवाने बचावले. त्यांना किरकोळ मार लागला. तर एमएच-१९-सीएफ-००६९ क्रमांकाची कार पावणेदहा वाजेच्या सुमारास वरूड फाटा वळणावर घसरून पुलाच्या कठड्याला धडकली. या कारमधील तीनजण जखमी झाले. त्यामध्ये दोन महिला असल्याचे समजते. घटनेची माहिती वरूड येथील प्रसाद जुनारे व त्यांचे बंधू तसेच शेतकरी फाटे यांनी बोराखेडी पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी रोडवर मोठ्या प्रमाणात रेती पडलेली असल्याचे दिसून आले. १०८ या रुग्णवाहिकेद्वारे जखमींना उपचारार्थ बुलढाणा येथे नेण्यात आले.
ब्लॅस्टींग ट्रॅक्टरने केली रेती साफ
घटनास्थळी पोहोचलेल्या बोरखेडी पोलिसांनी अपघाताचा धोका टाळण्यासाठी हवेचे प्रेशर असलेले ब्लॅस्टींग ट्रॅक्टर बोलावून रेती साफ केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू, पोलीस अंमलदार नंदकिशोर धांडे, वैभव खरमडे, मनोहर पंडित, ज्ञानेश्वर धामोडे तसेच वरूड, तांदुळवाडी व शेंबा येथील ग्रामस्थांसह मोताळा येथील सोपान धोरण, बाळू धोरण व कुटुंबातील तिघांनी रोडवर साचलेली रेती साफ केली.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!