स्मार्ट बुलढाणा

शेगावचे गजानन महाराज मंदिर ३१ डिसेंबरला रात्रभर खुले

'गण गण गणात बोते'च्या गजरात होणार नवीन वर्षाचे स्वागत 

शेगाव,(प्रतिनिधी):
३१ डिसेंबर रोजी संतनगरी शेगाव येथील गजानन महाराजांचे मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. होय, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत भाविकांना श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन करता येणार आहे. लाखो भक्तांसाठी गजानन महाराज मंदिर संस्थानने हा निर्णय घेतला आहे.
नवीन वर्षाची सुरुवात संत गजानन महाराज यांच्या दर्शनाने करण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक शेगाव येथे दर्शनासाठी येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही ३१ डिसेंबरच्या संपूर्ण रात्रभर मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन, भाविकांना सुलभ दर्शन मिळून त्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सरत्या वर्षाला भक्तीमय वातावरणात निरोप देऊन चैतन्याच्या दर्शनाने नवीन वर्षाची पहाट करण्यासाठी आता संपूर्ण संतनगरी सज्ज झाली आहे.
गर्दीच्या काळात शिस्त पाळावी आणि संस्थानच्या सूचनांचे पालन करावे. रात्रभर मंदिर उघडे राहणार असल्याने भाविकांनी घाई न करता शांततेत दर्शन घ्यावे, जेणेकरून सर्वांना सुरक्षितपणे श्रींचे दर्शन घेता येईल, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
गुरूवारचा दुग्धशर्करा योग
२०२६ वर्षाची सुरुवात म्हणजेच १ जानेवारी रोजी ‘गुरूवार’ हा श्रींच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि त्यातच गुरूवारचा योग आल्याने भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. ही मोठी गर्दी विचारात घेऊन प्रशासनाने दर्शन रांगांचे नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टीने चोख व्यवस्था केली आहे.
संतनगरीत भक्तांचा महासागर
नवीन वर्षाच्या दोन दिवस आधीपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या आणि खाजगी वाहनांनी भाविक संतनगरीकडे कूच करत आहेत. शेगावमधील सर्व भक्त निवास, धर्मशाळा आणि हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. भक्तांसाठी संस्थानमार्फत महाप्रसाद, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सुविधांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!