
सुभाष मोहिते
बुलढाणा,(प्रतिनिधी) :
मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात सरत्या वर्षात गुन्हेगारीचा आलेख चिंताजनक पद्धतीने उंचावला आहे. जिल्ह्यात विविध कारणांमुळे घडलेल्या हिंसक आणि रक्तरंजित घटनांमध्ये तब्बल ५३ जणांना ‘यमदरबारा’चे दर्शन घडले. तर ८८ जणांवर प्राणघातक हल्ले झाले. अनैतिक संबंध, जमिनीचा वाद, पूर्ववैमनस्य आणि दारूच्या नशेत होणारे वाद खुनांच्या घटनांची किनार ठरली. वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. मात्र, वर्षाच्या मध्यंतरानंतर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची धुरा सांभाळणारे आयपीएस नीलेश तांबे यांच्या कारकिर्दीत तपासचक्रे गतीमान झाली. नव्हेतर अनेक गंभीर व किचकट गुन्ह्यांचा छडा लावत बुलडाणा पोलीस दल अर्थात ‘टिम नीलेश तांबे’ कार्यक्षमतेच्या कसोटीवर खरे उतरल्याचे सुखद चित्र दिसून आले.
गेल्या वर्षाच्या तुलनेत सरत्या वर्षाच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत काही गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली असली, तर चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ या काळात जिल्ह्यामध्ये ५३ खुन झाले. गेल्या वर्षीचा हा आकडा ४५ होता. मात्र, नोव्हेंबर महिन्याचा विचार केल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खुनाच्या घटना कमी झाल्या आहेत. खुनाचा प्रयत्नांमध्ये मात्र ३३ ने वाढ झाली असून हा आकडा ८८ वर पोहोचला आहे. ९५८ ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारल्याची नोंद असून घरफोडी २१९ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये दिवसा होणाऱ्या घरफोडीपेक्षा रात्रीच्या घरफोडीचे (१८१ गुन्हे) प्रमाण अधिक आहे. तर वाहन चोरीच्या घटनांमध्ये मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत घट झाली असून यंदा ३०८ वाहने चोरीला गेल्याची नोंद आहे. शस्त्र कायद्यान्वये ४२ गुन्हे नोंदवून पोलिसांनी अवैध शस्त्रांवर जरब बसवली आहे. एकंदरीत, पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या दमदार आणि कणखर नेतृत्व व मार्गदर्शनात बुलढाणा पोलीस दलाची वाटचाल सध्यातरी “काबील ए तारीफ” ठरली आहे, हे तितकेच खरे!
काही गुन्ह्यांची शभर टक्के उकल
अनेक प्रकरणांत पोलिसांनी १०० टक्के गुन्हे उघडकीस आणले आहेत. रस्ता अपघात आणि मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या निष्काळजीपणाच्या घटनांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा थोडी का होईना घट झाली आहे. भाग एक ते पाचमधील ३ हजार ७२१ गुन्ह्यांपैकी ३ हजार १३५ म्हणजेच शेकडा ८५ टक्के तर भाग सहामधील दाखल ४ हजार २७१ गुन्ह्यांपैकी ४ हजार २२२ म्हणजेच शेकडा ९९ टक्के गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. राबविण्यात आलेल्या मोहिमांतर्गत जिल्ह्यात जुगारच्या १ हजार ७७१ तर दारूबंदीच्या ४ हजार ४८७ केसेस करून गुन्हेगारांना “सळो की पळो” करून सोडले, हे विशेष!
१२९ महिलांवर लैंगिक अत्याचार
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्याची आकडेवारी पाहता, सरत्या वर्षात लैंगिक अत्याचाराचे १२९ गुन्हे दाखल झाले. गेल्या वर्षी हे प्रमाण ११६ होते. तर विनयभंगाच्या घटनांमध्ये मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत (४०२ वरून ३८८) किंचित घट झाली आहे. फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असून नोव्हेंबर महिन्यात फसवणूकीचे ९ गुन्हे नोंदवले गेले. अपात्र मनुष्यवधाच्या ६ गुन्ह्यांची नोंद झाली असून सर्वच ६ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले.



