
मेहकर,(प्रतिनिधी) : चारित्र्यावर संशय घेत पत्नीसह चार वर्षाच्या निरागस मुलाचा हैवानरुपी बापाने कुऱ्हाडीने खुन केल्याची घटना २९ डिसेंबरच्या पहाटे २.३० वाजता उघडकीस आली होती. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपी बापास मेहकर न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. आज ३० डिसेंबर रोजी पोलीस कोठडी संपल्याने आरोपी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी कारागृहात केली आहे.
शहरातील शिक्षक कॉलनीत पत्नी रूपाली व चार वर्षांचा मुलगा रियांश याच्यासोबत राहणारा राहुल हरी मस्के (वय ३३ वर्षे) हा पत्नीच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत होता. संशयाचे कुरूप मनात खोलवर रुजल्या गेल्याने त्याच्यात सैतान जागी झाला आणि २९ डिसेंबरच्या पहाटे दोन वाजताच्या सुमारास आरोपी राहुलने पत्नी रूपाली मस्के (वय २८ वर्षे) हीच्यावर धारदार कुऱ्हाडीचे सपासप वार केले. गंभीर अवस्थेत रुपाली काही अंतरावर चालत जाऊन जमिनीवर कोसळली. याच दरम्यान राहुलने मुलगा रियांश (वय ४ वर्षे) या पोटच्या गोळ्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे वार करुन त्यालाही ठार केले होते. चिमुकल्या रियांशवर कुऱ्हाडीचा वार होताच, तो निरागस जीव किंचाळला. त्याचा आवाज ऐकुन लगतच्या खोलीत झोपलेले आरोपी राहुलचे आई-वडील, बहीण जागी झाले व त्यांनी त्याच्या खोलीकडे धाव घेत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या नराधमाने आतून दरवाजा लावून घेतला. शेजारच्यांना मदतीने खोलीचा दरवाजा तोडून आतधमध्ये प्रवेश केल्यानंतर पत्नी रुपाली व चिमुरडा रियांश रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सपोनी संदीप बिरांजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. आरोपी राहुलला ताब्यात घेतले. या प्रकरणी भास्कर शंकर वानखेडे (वय ५५ वर्षे) रा. मोळा यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी राहुल याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज ३० डिसेंबर रोजी राहुलला परत न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी कारागृहात केली आहे.



