
बुलढाणा, दि. ३०
आपल्या संस्कृतीत स्त्री म्हणजे देव्हाऱ्यातली लक्ष्मी समजल्या जाते. मात्र, सरत्या वर्षात जिल्ह्यातील ७६२ लक्ष्मींवर घराच्या चार भिंतींच्या आड शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अत्याचार झाले. १२९ महिला लैंगिक अत्याचार तर ३८८ महिला विनयभंगाच्या शिकार ठरल्या. मात्र, पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या नेतृत्वात महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक कक्ष तथा भरोसा सेलच्या “रणरागिण्यां”नी अत्याचार पीडित ६३७ माय माऊल्यांना न्याय मिळवून देत त्यांना आधार दिला.
स्त्रीला ‘ती’ म्हणून जगण्यापेक्षा ‘कोणाची तरी मुलगी, पत्नी किंवा आई’ म्हणूनच स्वतःची ओळख जपावी लागते. एकीकडे कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी आणि सांस्कृतिक मूल्य-संवर्धनासाठी स्त्रिया मोठ्या प्रमाणावर त्याग करत आहेत. तर दुसरीकडे वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे त्यागी ‘नारी’ घराबाहेरच नव्हे तर स्वत:च्या घरातही असुरक्षित असल्याची आकडेवारी सांगते.
गेल्या नऊ महिन्यांत जिल्ह्यातील महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक कक्ष तथा भरोसा सेलकडे कौंटुबिक हिंसाचाराच्या ९६० प्रकरणांची नोंद झाली. प्राप्त तक्रारींपैकी तब्बल ६३७ प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात या सेलला यश आले. १६५ प्रकरणात समझोता, १४८ प्रकरणांत बीएनएस ८५ (४९८ अ) दाखल करण्याचे पत्र, १९ प्रकरणांत कौंटुबिक हिंसाचाराचे पत्र, ११४ जणांना कोर्टात दाद मागण्याची समज देण्यात आली. ३२३ प्रकरणे चौकशीवर असून २०० प्रकरणे दप्तरी फाईल करण्यात आले आहेत. सोबतच या सेलने अनेकांना ‘मनोधैर्य’चा लाभ मिळवून दिला.
एवढ्यावरच न थांबता पोलीस अधीक्षक नीलेश तांबे,अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात भरोसा सेलच्या पोलीस उप निरीक्षक शिल्पा सूरगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लैंगिक शोषण किंवा अन्य प्रकारच्या हिंसाचारातील पीडितांना समुपदेशनातून बळ देण्याचे काम केले आहे. सोबतच, अनेकांच्या संसाराची विस्कटलेली ‘संसार घडी’ पूर्ववत बसविली आहे, हे विशेष!
…तरकौटुंबिक संस्कृतीचा आदर्श
लैंगिक अत्याचार पीडित महिलांकडे संशयाने बघितल्या जाते. त्यामुळे त्या हतबल होतात आणि निमुटपणे त्रास सहन करतात.त्यांना घरात सन्मानाची वागणूक, योग्य आधार दिल्यास बाहेर घडणाऱ्या घटनांचा सामना करण्यासाठी त्यांना नैतिक बळ मिळेल. यामुळे महिला सुरक्षा व कौटुंबिक संस्कृतीचा जगात आदर्श निर्माण होईल, अशी प्रतिक्रीया भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक शिल्पा सुरगडे यांनी ‘हिंदवार्ता’ शी बोलतांना दिली.
पुरुषांना दोषी ठरवणेही गैरच
स्त्रियांच्या संरक्षणाकरिता करण्यात आलेल्या विविध कायद्यांमध्ये स्त्री-पुरुष समानतेचा विचार कमी प्रमाणात झाला. त्यामुळे काही महिला याचा दुरुपयोग करतात. यामध्ये कौटुंबिक हिंसेच्या कायद्याचे प्रमाण अधिक आहे. स्वत:च्या चुका झाकण्यासाठी, नवरा, सासू-सासरे व ननंद यांच्या विरोधात खोट्या केस करणे, नंतर संमतीने घटस्फोट घेणे, मोठ्या रक्कमेची पोटगी घेण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे प्रत्येक वेळी पुरुषांना दोषी ठरवणे, हे देखील गैरच!



