
मुंबई,(प्रतिनिधी) : आरोग्यसेवा आयुक्तालय (मुंबई) येथे पार पडलेल्या कार्यक्रमात राज्यातील १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ‘सेवाखंड कालावधीत क्षमापित पत्राचे वितरण करण्यात आले.
नुकतेच १५० डॉक्टरांना ‘सेवा खंड कालावधी क्षमापित’ केले होते. एकूण ३४५ डॉक्टरांना पत्र देण्यात आले असून उर्वरित सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना येत्या महिन्याभरात क्षमापण पत्राचे वितरण करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले. या ऐतिहासिक निर्णयामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक प्रकारचे लाभ मिळू शकणार आहेत.
आरोग्य विभागात २००९ पूर्वी अस्थायी स्वरूपात अनेक वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. २००९ मध्ये या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शासकीय सेवेत समावेश झाला आहे. मात्र ‘सेवाखंड कालावधी क्षमापित नसल्याने त्यांना इतर लाभापासून वंचित राहावे लागत होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेकडून याबाबत वारंवार मागणी होत होती. त्या अनुषंगाने आरोग्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे सर्व पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड क्षमापित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची सलग सेवा ग्राह्य धरण्यात येणार असून त्यामुळे इतर आर्थिक व प्रशासकीय लाभ त्यांना मिळणार आहे.
आरोग्यव्यवस्थेत समर्पित सेवा देण्याचा निश्चय करूया, या निर्णयामुळे आरोग्य सेवेत गुणात्मक वाढ होईल. नक्षलग्रस्त आदिवासी व डोंगरी भागात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनसह विशेष इन्सेटिव्ह देण्यासाठी देखील वित्त विभागास प्रस्ताव पाठवला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु झाली असुन उपचारासाठी मान्य असलेल्या आजारांची संख्या वाढवून २३९९ करण्यात आली आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मानधनातही भरघोस वाढ केली असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपसचिव केंद्रे, सहसंचालक राजेंद्र भालेराव, अवर सचिव गायकवाड, मुख्य प्रशासकीय अधिकारी कारेगावकर, आरोग्य विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


