
धाड,(प्रतिनिधी) : पोलीस अधीक्षक नीलेश तांबे,अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत धाड पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. धाड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला तीन महिन्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
धाड (ता.बुलढाणा) पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चौथा (ता.जि. बुलढाणा) येथील रहिवासी असलेला देवसिंग फकीरा बिबे (वय ४० वर्षे) हा इसम गेल्या काही काळापासून अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाल्याचा ठपका ठेवत धाड पोलिसांनी त्याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला आणि १७ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये सदर प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत बुलढाणा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन, तसेच आरोपीवरील गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन १९ डिसेंबर २०२५ रोजी सदर आरोपीला बुलढाणा जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे ग्रामीण भागातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्याचा इशारा धाड ठाणेदार प्रताप भोस यांनी दिला आहे.
यांनी पार पाडली कारवाई
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात धाड ठाणेदार प्रताप भोस, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे, पोलीस अंमलदार युवराज मुळे आणि नितीन माळोदे यांनी सदर कारवाई पार पाडली.



