महाराष्ट्र माझा

दिल्लीत रंगणार अस्सल मराठमोळी ‘हुरडा पार्टी’!

संक्रांत महोत्सवाचे आयोजन; महाराष्ट्र सदनात दरवळणार ग्रामीण संस्कृतीचा सुगंध 

 दिल्ली,(प्रतिनिधी) : दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीची माहिती देण्यासाठी कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनात ९ ते ११ जानेवारी दरम्यान दुपारी १२ ते रात्री ९.३० या वेळेत ‘हुरडा पार्टी’ आणि ‘मकर संक्रांत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सदनात डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या ‘महाराष्ट्र खाद्य महोत्सवा’ला दिल्लीकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, आता हिवाळी हंगामाची मेजवानी म्हणून ‘हुरडा पार्टी’चे आयोजन करण्यात आले आहे. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवात ‘तिळगूळ’ आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. पुणे, सोलापूर, नाशिक आणि मराठवाड्यातील शेतांमध्ये ज्याप्रमाणे शेकोटीवर हुरडा भाजून आनंद साजरा केला जातो, तसाच अनुभव येथे दिला जाणार आहे. हुरड्यासोबतच खमंग लसूण चटणी, शेंगदाणा कूट, पिवळाधमक गूळ, साजूक तूप, ताक आणि चुलीवरचे वाफाळलेले पिठलं-भाकरी,भरीत भाकरी, बटाटेवडा, भजी सोबतच ऊस, बोरं, ओला हरबरा अशा अस्सल गावरान पदार्थांची रेलचेल येथे असणार आहे. थंडी, शेकोटीची ऊब आणि संगीत मैफिलीत हुरड्याचा आस्वाद, असा दुग्धशर्करा योग या निमित्ताने जुळून येणार आहे. याबरोबरच संक्रात वाणासाठी महिलांनी बनविलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
 शहर आणि गाव यांना जोडणारा हा भावनिक पूल दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या अधिक जवळ घेऊन जाणारा ठरणार आहे. या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्राच्या आदरातिथ्याचा आणि चवीचा आनंद घ्यावा, असे आवाहन निवासी आयुक्त आर विमला आणि गुंतवणूक निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांनी केले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!