‘दुर्गंधीचा’ शाही थाट! बुलढाणा बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील चित्र
महामंडळाचा 'प्रवासी राजादिन' की 'प्रवासी सजादिन'?

बुलढाणा,(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सध्या मोठ्या उत्साहात ‘प्रवासी राजा दिन’ साजरा करत असल्याचे चित्र रंगवत आहे. मात्र, बुलढाणा बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाऊल ठेवताच या ‘राजाचे’ स्वागत गुलाबाच्या फुलांनी नाही, तर ‘कुजलेल्या प्रेतासारख्या’ उग्र दुर्गंधीने केले जात आहे. प्रवेशद्वाराच्या अगदी डाव्या बाजूला साचलेला घाणीचा अजस्त्र ढिगारा पाहून, हे बसस्थानक आहे की उकिरडा, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
एकीकडे स्वच्छतेच्या आणाभाका घेतल्या जातात, तर दुसरीकडे प्रत्यक्ष प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. प्रवाशांना बसमध्ये चढण्यापूर्वी या घाणीच्या साम्राज्यातून नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. ही दुर्गंधी इतकी तीव्र आहे की, जणू महामंडळाने प्रवाशांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहण्याचेच ठरवले आहे. ‘प्रवासी राजा’ दिनाच्या नावाखाली प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा हा नवा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
या साचलेल्या घाणीमुळे केवळ दुर्गंधीच नाही, तर मोठ्या प्रमाणात डास आणि माश्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रवाशांच्या आरोग्यावर हा ढेपाळलेला कारभार थेट ‘घाला’ घालत आहे. प्रवाशांनी तिकीट काढून प्रवास करायचा की स्वतःच्या आरोग्याचा बळी द्यायचा, असा उपरोधिक सवाल आता नागरिक विचारत आहेत.
प्रशासन ढाराढूर?
मुख्य प्रवेशद्वारावर एवढी घाण आणि हा ‘ढेपाळलेला कारभार’ पाहून आता प्रवाशांनाच ‘महामंडळाच्या प्रवासासाठी’ नाही, तर ‘जगण्यासाठी’ देवाचा धावा कराव्या लागत आहे. महामंडळाने हा कचरा उचलून प्रवाशांना मोकळा श्वास घेऊ द्यावा, इतकीच माफक अपेक्षा आता उरली आहे.



