स्मार्ट बुलढाणा

धाडमध्ये शासकीय महाविद्यालयाचा अभाव

गरिबांच्या मुलांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न अधांतरी!

अभिनय बोर्डे

धाड,(प्रतिनिधी) : धाड हे तालुका पातळीचे गाव असूनही याठिकाणी अद्याप एकही शासकीय महाविद्यालय सुरू झालेले नाही. त्यामुळे या भागातील शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे सर्वसामान्य, शेतमजूर आणि कष्टकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न धुळीस मिळत आहे.

धाड परिसरात खाजगी महाविद्यालय आहे. मात्र ते गावापासून ३ ते ४ किलोमीटर अंतरावर आहे. या महाविद्यालयाची फी वाजवीपेक्षा जास्त असल्याने रोजंदारी करणाऱ्या पालकांना ती भरणे अशक्य झाले आहे. स्थानिक पातळीवर सोय नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मराठवाड्यातील पारध, पिंपळगाव रेणुकाई, धावडा आणि जाफराबाद अशा दूरच्या ठिकाणी जावे लागत आहे. सध्या या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर रस्ते विकासकामे सुरू असल्याने अपघाताचा धोका कमालीचा वाढला आहे. तरीही, भविष्य अंधारात जाऊ नये म्हणून विद्यार्थी जीव मुठीत धरून दररोज प्रवास करत आहेत. सततच्या प्रवास खर्चामुळे पालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. अनेक कुटुंबांची परिस्थिती खालावली असून त्यांनी नाइलाजाने आपल्या पाल्यांचे शिक्षण बंद करून त्यांना कामाला लावल्याचे अनेक उदारने आहेत. तालुका पातळीच्या गावात अशी परिस्थिती निर्माण होणे ही समाजासाठी निश्चितच लाजिरवाणी बाब आहे.

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष

या संदर्भात स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन धाड येथे शासकीय महाविद्यालय मंजूर करावे, अशी मागणी होत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!