
अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): जिल्ह्यात वाढलेल्या संघटीत गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचा ध्यास घेतलेल्या पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच धडाकेबाज कारवाई केली. मलकापूर येथील सतीश झाल्टे खून प्रकरणातील टोळीचा म्होरक्या संकेत सुनिल उन्हाळे याच्यासह त्याच्या आठ साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिल्याने बुलढाणा जिल्ह्याच्या गुन्हेगारी जगतात चांगलीच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील पिंप्राळा येथील सतीश गजानन झाल्टे या युवकाची किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून हत्या झाली होती. हत्या करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी यापूर्वीही खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत. या टोळीची दहशत संपविण्यासाठी तसेच गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी आरोपी संकेत सुनील उन्हाळे (वय २२ वर्षे),साहिल सुधाकर पालवे (वय १८ वर्षे), देव तिलकसिंग राजपूत (वय २४ वर्षे), अरविंद उर्फ गबऱ्या अजय साळुंखे (वय १९ वर्षे),गणेश विजय वायडे (वय २१ वर्षे) सर्व रा. मलकापूर, हर्षल सुभाष घोंगटे (वय २३ वषे) रा. मोताळा, गणेश विजय वायडे (वय २१ वर्षे), रा. मलकापूर, कौशल संतोष घाटे (वय २२ वर्षे) रा. मलकापूर, आदित्य जनार्दन वानखेडे (वय २४ वर्षे) आणि ऋषीकेश रामलाल इंगळे (वय २३ वर्षे) यांची माहिती काढून कारवाईच्या परवानगीचा प्रस्ताव अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रातनाथ पोकळे यांच्यांकडे पाठविला होता. त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आणि पोलीस अधीक्षकांनी सादर केलेल्या पुराव्यांची दखल घेत तातडीने या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि सुनील अंबुलकर, सपोनि नरेंद्र पेंदोर आणि त्यांच्या पथकाने सदर कामगिरी यशस्वी पार पाडली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या या समन्वयामुळेच गुन्हेगारांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. आधीच कारागृहात असलेल्या या आरोपींच्या अडचणींमध्ये आता चांगलीच वाढ झाली आहे.
तांबे यांची दूरदृष्टी आणि ‘मकोका’चे पाश
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्याकडे निडर, निस्वार्थ, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पाहील्या जाते. बुलढाणा पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यावर भर दिला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी वैयक्तीक लक्ष घालुन संघटीत टोळ्यांची माहिती संकलीत केली. नव्हेतर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या याच दूरदृष्टीमुळे मलकापूरमधील या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीवर ‘मकोका’चे पाश कसले गेले आहेत, हे विशेष!



