
बुलढाणा, (प्रतिनिधी) : पांढरकवडा अभयारण्यात जन्माला आलेल्या तथा पेंच व्याघ्र प्रकल्प (नागपूर) येथील ‘PKT7CP1’ नावाच्या तीन वर्ष वयाच्या नर वाघाला ज्ञानगंगा अभयारण्य क्षेत्रात मुक्त करण्यात आले. मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील निसर्गसंपन्न ज्ञानगंगा अभयारण्यात या वाघाचे पुनर्वसन करण्याचा हा महत्त्वाकांक्षी टप्पा वनविभागाने यशस्वीपणे पार पाडल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे.
ज्ञानगंगा अभयारण्य क्षेत्रात मुक्त करण्यात आलेला हा नर वाघ मुळचा यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील आहे. अवघ्या ६ महिन्यांचा असताना या वाघाच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या वाघासह त्याच्या बहिणीला पेंच व्याघ्र प्रकल्पात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत या दोन्ही वाघांनी जंगलात शिकार करणे आणि जगण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कौशल्ये आत्मसात केली असून हा वाघ पूर्णपणे सक्षम झाल्यानंतर त्याला ज्ञानगंगा, तर त्याच्या बहिणीला (मादी वाघ) पैनगंगा अभयारण्यात सोडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती.
जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हे वाघांच्या अधिवासासाठी अत्यंत पोषक मानले जाते. अभयारण्यात रोही, रानडुक्कर, सांबर, भेडकी, काळवीट आणि मोर यांसारख्या तृणभक्षी प्राण्यांची मोठी संख्या असून अभयारण्यातील ‘देव्हारी’ गावाचे पुनर्वसन पूर्ण झाल्यामुळे या क्षेत्रात एकही गाव अस्तित्वात नाही. त्यामुळे या ठिकाणचा मानवी हस्तक्षेप पूर्णपणे थांबला आहे. तसेच यापूर्वी २०२० मध्ये ‘T1C1’ या वाघाने सुमारे ९ महिने या भागात वास्तव्य केले होते. त्यामुळे हे क्षेत्र वाघांसाठी सुरक्षित असल्याचे सिद्ध झाल्याने या वाघासाठी हे क्षेत्र निवडण्यात आले आहे.
कडक सुरक्षा व्यवस्था
या वाघाला अभयारण्यातील ५ हेक्टरच्या विशेष क्षेत्रात देखरेखीखाली ठेवण्यात आले असून हालचालींवर लक्ष ठेवण्यासह त्याच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही आणि ट्रॅप कॅमेरे देखील बसविण्यात आले आहेत. सोबतच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गस्त वाढवण्यात आली आहे.
या अधिकाऱ्यांची होती उपस्थिती
वाघाच्या पुनर्वसन प्रक्रियेदरम्यान अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी नागुलवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रवि खोब्रागडे, सहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी दिपेश लोखंडे व प्रकाश सावळे, तसेच संजय राठोड, श्रीकृष्ण बोबडे, अरुण घुईकर, समाधान गुगळे यांसह वनरक्षक आणि मदतनीस उपस्थित होते.



