क्राईम जगत
म्हसल्याचा पिसाटलेला! घरात घुसून केला तरुणीचा विनयभंग
दोन वर्षांपासून करत होता पाठलाग; धाड पोलिसांत गुन्हा दाखल

धाड,(प्रतिनिधी) : ज्या वयात कुटुंबाचा आधार बनायचे, त्याच वयात लेकिबाळींना छेडायाचा उद्योग काही आंबट शौकीन करतात. महिला व मुलींनी भीक घातली नाही, की जोरजबरदस्ती करतात. असाच काहीसा प्रकार धाड (ता. बुलढाणा) पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आणि छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गालगत वसलेल्या एका गावात समोर आला. एका ३० वर्षीय आरोपीने महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा सतत पाठलाग सुरू केला. नव्हेतर त्याच्या गावालगतच असलेल्या तरुणीच्या गावात जाऊन, तिच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. एवढ्यावरच न थांबता विरोध केला म्हणून तरुणीच्या काकांना मारहाण केली आणि जीवाने ठार मारण्याची धमकी दिली.
इंग्रज काळापासून ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असलेले आणि धाड (ता.बुलढाणा) पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या म्हसला येथील रहिवाशी असलेल्या आरोपी प्रशांतचा (वय ३० वर्षे) गावापासून अवघ्या चार-दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या गावातील एका २१ वर्षीय तरुणीवर जीव जडला. शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या या तरुणीचा त्याने २०२३-२४ पासून सतत पाठलागही केला. दरम्यान, तरुणी गावाकडे आलेली असल्याची माहिती आरोपी प्रशांतला झाली आणि ३ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्याने तरुणी राहत असलेल्या गावात एन्ट्री केली. तरुणी घरात एकटी असल्याचे हेरून आरोपी प्रशांतने तिच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला आणि वाईट उद्देशाने तिचा हात पकडून छेड काढली. एवढ्यावरच न थांबता आडवा आलेल्या पीडितेच्या काकास चापटबुक्यांनी मारहाण केली. तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत तरुणीसह त्यांना जीवाने ठार मारण्याची धमकी देखील दिली.
या प्रकरणी पीडित तरुणीने धाड पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रशांतविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ७४, ७८, ३५२, ३५१ (२) आणि ३३३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार प्रतिम भोस यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे आणि त्यांचे सहकारी करत आहेत.



