क्राईम जगत
बापरे! “इनोवा”च्या डीक्कीत चार-चार म्हशी!

छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी) : जसजसे तंत्रज्ञान बदलत आहे,तसतसे गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धतही बदलत असून गुन्हेगारही आता हाय-टेक झाल्याचे दिसून येत आहे. आजवर अधिकारी, उद्योगपती, पुढाऱ्यांना आपण “इनोवा” गाडीतून फिरताना बघितले असेल.पण, याच इनोवामधून एक नव्हे,दोन नव्हेतर l चक्क चार “म्हशींची”ची तस्करी केल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली. होय, छत्रपती संभाजीनगर येथील गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून “इनोवा”मधून होणाऱ्या म्हशींच्या तस्करीचा पर्दाफास केला.
छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेचे पथक ७ जानेवारीच्या पहाटे गस्तीवर होते. त्यावेळी “इनोवा” या महागड्या कारमधून मोठ्या प्रमाणात म्हशींची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पहाटे पावणेपाचच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर सापळा लावला. त्यावेळी समोरून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या “इनोवा” कारला पथकाने हाथ देऊन कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने पोलिसांकडे दुर्लक्ष करत कार अधिक वेगाने दामटली. पोलिसांनी जुब्ली पार्क, चांदणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गाडीचा पाठलाग करून चाऊस कॉलनीत गाडीला गाठले.
मात्र, चालक गाडी रस्त्यावर सोडून पळून गेला. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता,गाडीच्या डिक्कीत तब्बल चार म्हशी निर्दयीपणे कोंबलेल्या दिसून आल्या. म्हशींचे पाय, तोंड बांधलेले असल्याने श्वास घेतांना त्यांची दमछाक होत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी उपरोक्त चारही म्हशींची सुखरूप सुटका करून महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाच्या स्वाधीन केल्या. या प्रकरणी सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार जगन्नाथ जेधे हे करीत आहेत.



