क्राईम जगत

भाजप पुढाऱ्याच्या घरात घुसून राडा!

हातात चाकू घेऊन सामानाची तोडफोडही केली

छत्रपती संभाजीनगर,(प्रतिनिधी): सध्या स्थानिक हनुमानवाडी भागातील केशवनगर परिसरात झालेल्या हायप्रोफाईल राड्याच्या चर्चेने छत्रपती संभाजीनगरचे चौक चांगले रंगलेले दिसत आहे. दोन जवळच्या नातेवाईकांमधील वैयक्तिक वाद थेट घरातील राड्यानंतर चक्क पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचला आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेले जालना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्यामसुंदर उढाण यांनी भाजपचे सतीश घाटगे यांच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत केलेली नासधूस आणि पोलिसांच्या ताब्यातून पहाटे गायब होत पोलिसांना दिलेले आव्हान कायद्याच्या राज्यावर प्रश्न उपस्थित करणारी आहे.

केशवनगरीत आपल्या कुटुंबीयांसोबत राहणारे सतीश घाटगे हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत.६ जानेवारीच्या मध्यरात्री घाटगे आपल्या घरात असताना,रात्री दीड वाजताच्या सुमारास श्यामसुंदर उढाण त्यांच्या घरासमोर गेले. हातात चाकू घेऊन घाटगे यांच्या घराचे सेंट्रल लॉक तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. आणि जोरजोरात शिवीगाळ सुरू करत घाटगे यांच्या घरातील सामानाची तोडफोड केली. अचानक सुरू झालेला राडा बघून घाटगे यांनी स्वतःसह कुटुंबियांना बेडरूममध्ये कोंडून घेतले आणि पोलिसांना फोन केला. घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना न जुमानता उढाण यांनी घराबाहेर उभ्या असलेल्या घाटगे यांच्या कारचीही तोडफोड केली.

घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन पोलिसांनी उढाण यांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला नेले. सतीश घाटगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच ते पोलिसांच्या हातावर तुरी देत पोलीस स्टेशनमध्ये पसार झाले.घडलेल्या घटनेला वैयक्तिक वादाची किनार असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असून या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांत उढाण यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्चिन्ह 

राज्यात व केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरात घुसून त्यांच्यावर झालेला हल्ला, हल्ल्यानंतर आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होण्याची घटना पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्चिन्ह लावणारी असल्याची चर्चा आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!