स्मार्ट बुलढाणा
शेतात जाताना करंट लागून महिलेचा मृत्यू

मोताळा,(प्रतिनिधी) : शेतातील विद्युत तारेला स्पर्श झाल्याने एका महिलेचा करंट लागून जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील आव्हा शिवारात ६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
तालुक्यातील कोल्ही गवळी येथील कमलबाई डिगंबर भारती (वय ५०) ही महिला गावातील काही महिलांसोबत माकोडी येथील डिगंबर सुरेश बढे यांच्या आव्हा शिवारात असलेल्या शेतात कामाला जात होती. मधमाशांच्या भीतीने महिला दुसऱ्या रस्त्याने शेतात जात होत्या. दरम्यान, मक्याच्या शेतात गेल्या असता तेथे वीज तारेला स्पर्श झाल्याने कमलबाई भारती यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. सुदैवाने सोबतच्या महिला दूर पळाल्याने त्यांचा जीव वाचला. कमलबाई व त्यांचे पती डिगंबर भारती हे दोघेही दिव्यांग असून त्यांना मूळबाळ नव्हते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.



