स्मार्ट बुलढाणा
बापरे! १०१ ट्रॅक्टर वाढायला आणि दोन लाखावर भाविक जेवायला!!
४० एकर परिसरात एकाच वेळी ५३ पंगती; हिवरा आश्रम येथे विवेकानंद जयंतीनिमित्त भव्य महाप्रसाद

हिवरा आश्रम,(प्रतिनिधी) : स्वामी विवेकानंद जयंती महोत्सवानिमित्त हिवरा आश्रम येथे आयोजित महाप्रसादाचा राज्यभरातून आलेल्या तब्बल दोन लाखांहून अधिक भाविकांनी लाभ घेतला. ४० एकर परिसरात एकाच वेळी ५३ पंगती बसल्या. तर दोन लाखावर भाविकांची विक्रमी महापंगत ठरली. आज १० जानेवारी रोजी झालेल्या या महापंगतीने गेल्या ६३ वर्षांच्या परंपरेतील भाविकांच्या उपस्थितीचा स्वतःचाच विक्रम स्वतः मोडीत काढला,हे विशेष!

महाप्रसादापूर्वी “स्वामी विवेकानंद की जय…भारत माता की जय…पूज्य शुकदास महाराज की जय…” या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पूज्य शुकदास महाराज यांच्या “आरती करू ब्रह्मरूपाला” या भावपूर्ण आरतीनंतर महाप्रसाद वितरणास प्रारंभ झाला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुमारे दोन लाख भाविकांच्या महापंगतीने या भव्य सोहळ्याची सांगता झाली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील माजी आमदार संजय रायमुलकर विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूरचे विश्वस्त हभप प्रकाश महाराज, असोबा संस्थांनचे आसाराम भारती यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. ४० एकर परिसरात एकाच वेळी ५३ पंगती बसविण्यात आल्या होत्या. तब्बल १०१ ट्रॅक्टरद्वारे व सुमारे तीन हजार स्वयंसेवकांच्या सहभागातून महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले.
विशेष बाब म्हणजे कोणतीही अस्वच्छता न करता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही महापंगत पार पडली. विवेकानंद शिक्षण संकुलातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भाविकांचे कुंकू-चंदन तिलक, धूप व आरतीद्वारे पूजन करून स्वागत केले.
यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष ऋषी जाधव, नगराध्यक्ष किशोर गारोळे, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, भाजपा नेते सुरेश आप्पा कबुतरे,माजी जिल्हाप्रमुख भास्करराव मोरे, दत्ताभाऊ खरात,गिरधर ठाकरे,शिवसेना तालुखा प्रमुख निंबा पांडव, व्हईस ऑफ मीडिया सिद्धेश्वर पवार,तहसीलदार निलेश मडके, सुरेश मुंदडा, रिसोड नगर अध्यक्ष भागवत क्षीरसागर, विवेकानंद आश्रमचे अध्यक्ष अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, अशोक पाध्ये, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त कैलास भिसडे, पुरुषोत्तम आकोटकर, दयानंद थोरहाते, अशोक गिऱ्हे,उद्योजक एकनाथ दुधे, रिसोड येथील प्राध्यापक सुरेशराव जुनघरे, डॉक्टर अतुल जुनघरे, रेडिओलॉजिस्ट डॉक्टर सौ. नुतन जुनघरे, डॉ. कु. अंजली काळे, प्राचार्या सौ. बबिता काळे, अध्यक्ष राजर्षी शाहू महाविद्यालय, धाड व जिजाऊ अर्बन बँक, बुलढाणाचे नंदारामजी काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, सरपंच मनोहर गिऱ्हे, नितीन इंगळे, विठ्ठल भाकडे, प्रमोद रायमूलकर, पत्रकार समाधान म्हस्के पाटील, सदाशिव काळे, ओमप्रकाश देवकर, भरत सारडा, मनीष मांडवगडे, शिवप्रसाद थुट्टे, प्राचार्य आर. डी. पवार, डॉ.सुभाष कालवे, संजय भरती, शिवदास सांबपुरे, डॉ. पंढरीनाथ शेळके, मंगेश जकाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाप्रसाद स्थळावरील मनोऱ्यावरून वेदांताचार्य गजाननदादा शास्त्री यांनी शंखध्वनीसह केलेल्या स्वामी विवेकानंद व पूज्य शुकदास महाराज यांच्या जयनाम घोषणांनी संपूर्ण आसमंत अक्षरशः निनादून गेला. भाविकांनी अत्यंत भक्तिभावाच्या वातावरणात महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विवेकानंद आश्रमाचे आजी-माजी विश्वस्त, पदाधिकारी व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. दरम्यान, पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.



