स्मार्ट बुलढाणा

जिजाऊ जन्मोत्सव विशेष! जिजाऊंचा आदर्श अंगीकरण्याची गरज!

मलकापूर:आदिलशाही, निजामशाही, मुघल, डच, पोर्तुगीजाच्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर मूर्तिमंत शिवराज्य, सुराज्य उभे करणाऱ्या माँसाहेब जिजाऊ…विखुरलेल्या रयतेला एकसंघ करत जनआंदोलन उभं करत रयतेच्या स्वप्नांची पूर्तता करत स्वराज्य निर्माण करणाऱ्या स्वराज्य संकल्पिका म्हणजेच माँसाहेब जिजाऊ. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत न डगमगता अत्यंत धैर्याने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. इथल्या सर्वसामान्य रयतेसोबत जो काही अन्याय, अत्याचार, अपमान होत होता, तो अन्याय घालवण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक स्वराज्य नव्हे एक सुराज्य असावे, हे स्वप्न जिजाऊ मोसाहेबांनी आणि शहाजीराजांनी बघितले,नव्हेतर ते सत्यात उतरविले.

जिजाऊ माँसाहेबांनी केवळ शिवरायांनाच घडविले नाहीतर, त्यांच्या मनात रयतेप्रति प्रचंड प्रेम, करुणा होती. याच कणवेने त्यांनी मायने, प्रेमाने, वास्तल्याने, स्नेहाने इथल्या प्रत्येक मावळ्याला आपलेसे केले.

तानाजी, येसाजी, कान्होजी, बाजी असे कितीतरी नावे घेता येतील. या सर्वांचे तसेच सर्व रयतेचं मातृत्व स्वीकारलेल्या जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेड राजा येथे लखोजीराजे जाधव आणि माळसाराणीच्या पोटी झाला. चार मुलांच्या पाठीवर लेक जन्माला आली. ढोल, ताशे, नगारे वाजू लागले. मिस्टानाच्या पंगती उठत होत्या. दिव्यांच्या आरसाने सिंदखेड राजानगरी तेजोमय झाली होती. लेकीच्या जन्माचे स्वागत जाधवरावांनी प्रचंड उत्साहात केले. नव्हेतर लेकीच्या जन्माचं स्वागत कसं करावं याचा मापदंडच लखुजी राजे जाधव यांनी घालून दिला. जो आजही तितकाच महत्त्वाचा वाटतो. लखोजीराजे जाधव यांनी जिजाऊंना घोडेस्वारी, तलवारबाजी, दांडपट्टा अशा विविध कलांचे आणि भाषांचे प्रशिक्षण दिले.

आज एकविसाव्या शतकामध्ये स्त्रिया चूल आणि मूल याच्या पलीकडे विचार करू पाहत नाही. किंवा समाजाने तशी व्यवस्था निर्माण केलेली आहे,असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अपवादात्मक काही स्त्रिया सोडल्या तर आजही परिस्थिती फारसी बदललेली दिसत नाही. जिजाऊ माँसाहेब जहागीरदाराची लेक होती. त्यामुळे अत्यंत सुख समाधानाने त्या आपले आयुष्य जगू शकल्या असत्या. माझी जहागीरदारी, माझं घर, माझा संसार असा विचार करू शकल्या असत्या. मात्र, त्यांनी हा विचार न इथल्या रयतेचा विचार केला. सर्वसामान्यांना होणारा त्रास, स्त्रियांवर,मुलींवर होणारे अत्याचार त्यांनी उघड्या डोळ्यांनी बघणे कदापी शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघितलं.

छत्रपती शिवाजी महाराजांना तळहातावरील फोडाप्रमाणे न वागवता बालपणीच त्यांच्या गुरु बनून त्यांना आप्तस्वकीय,परकीय, रामायण,महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. घोड्यावर, बसणे, तलवार चालवणे सारखी युद्धनीती, न्याय निवाडा करणे,याचे शिक्षण दिले. शिवबा…तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं आहे, तुम्हाला शत्रूचा निपाद करायचा आहे, मी कायम तुमच्या पाठीशी आहे, हा आत्मविश्वास जिजाऊंनी शिवरायांना दिला. नव्हेतर इतिहासाची पाने चालल्यावर प्रकर्षाने जाणवते की, शिवरायांच्या आयुष्यात आलेले अनेक पेच, प्रसंग, संकटे, मग ते सिद्धी जोहरच्या पन्हाळगडाला पडलेला वेढ्याच्या रूपाने असो, अफजलखान, शाहिस्तेखानाच्या रूपाने असो, माँसाहेब खंबीरपणे शिवरायांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेत असताना या माऊलीने स्वराज्याची इंचभर जमीन देखील यवनांच्या घशात जाऊ दिली नाही, हे विशेष!

परंतु, आजची स्त्री ही आत्मकेंद्री बनत चाललेली आहे. आपण या समाजाचा काहीतरी देणं लागतो, ही भावना ती स्वतःच्या किंवा मुलांच्या मनामध्ये रुजवतांनी दिसत नाही. सध्यस्थितीतल्या मातांसाठी खरंच आत्मचिंतनाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक संकटात साथ देत असताना जिजाऊंनी कधीही कुठलेही होम, हवन, यज्ञ, कर्मकांड केले नाहीत. तर बुद्धीच्या चातुर्याने आपल्या पराक्रमाने त्यांनी प्रत्येक संकटातून मार्ग काढला. म्हणून शहाजीराजांनाही त्यांचा सल्ला मोलाचा वाटत असे. परंतु आज आमच्या कितीतरी शिकल्या सवरलेल्या भगिनी “एकलोटा जल,सब समस्या ओ का हल”, अशाप्रकारे आपल्या अडचणी सोडवू पाहताना दिसतात. जिजाऊ कधीही दैववादी नव्हत्या, तर त्या प्रयत्नवादी होत्या. आजच्या भगिनींनी सुद्धा जिजाऊ प्रमाणे प्रयत्नवादी होणे गरजेचे आहे.

इथल्या अस्ताव्यस्त झालेल्या, विखुरलेल्या समाजाने एक व्हावे यासाठी शिवरायांची आठ लग्न जिजाऊंनी लावून दिली. यागील उद्देश एकच होता, तो म्हणजे समाज एकत्रित होणे आणि नाती वृद्धिंगत होणे. यातूनही आजच्या पिढीला बरेच काही शिकण्यासारखे आहे. नवीन नाते निर्माण होतात, पण छोट्या छोट्या गोष्टीतून त्यात वितृष्ट निर्माण होतानी दिसते. सासु-सुनेचे नाते हे संघर्षाचे नाते नव्हते, तर अत्यंत प्रेमाचे, वात्सल्याचे, जिव्हाळ्याचे होते. म्हणूनच त्यांनी तुकाईंना आपल्या लहान बहिणीप्रमाणे वागवले. दोन स्त्रियामधील नातं कसं असावं, हेही जिजाऊंच्या चरित्रामधून शिकणे गरजेचे आहे.

आजघडीला मोबाइल, सोशल मीडिया आणि टीव्हीवरील हेवेदावे, द्वेष, मत्सर, डावपेच, आपल्याच माणसांच्या विषयी चाललेल्या कुरघोड्या, बघून आमची पिढी मोठी होत आहे आणि या आभासी जीवनाचा वास्तविक जगण्यासोबत काहीही संबंध नाही, हे त्यांच्या लक्षातही येत नसल्याने असंख्य कुटुंब हे विस्थापित होत आहेत. म्हणून आजही या समाजासमोर जिजाऊंचा आदर्श तितकाच महत्त्वाचा आहे, आणि तो आम्ही अंगीकारलाच पाहिजे…जय जिजाऊ जय शिवराय!

शिवमती वनिता माधवराव गायकवाड, संपर्क क्रमांक-८६९८२२३४३५

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!