स्मार्ट बुलढाणा
डोणगावात कुत्र्यांची दहशत; धरपकड सुरु!

डोणगाव,(प्रतिनिधी): कुत्र्यांची संख्या वाढली असून, चावा घेण्याच्या घटना वाढल्याने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी ग्रामपंचायतीकडे ९ जानेवारीला केली.

येथील मो. फरहान मो. मतीन याच्या पायाला कुत्रा चावला. मागेही काही घटना घडल्या. मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता क्रांतिकारी शेतकरी संघटनेने मेहकर गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन केले होते. त्यानंतर ९ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीने कुत्रे पकडण्यास सुरुवात केली. सावजी यांनी म्हटल्यानुसार, मोकाट कुत्र्यांचा शाळकरी मुले, बकऱ्या, गोठ्यातील जनावरांना त्रास होत आहे. यापूर्वी महालक्ष्मीनगर, कौशल्यानगर, कोलेश्वर परिसर, आरेगाव चौक, मटन मार्केट, इंदिरानगर, सावजी जिनिंग, शेलगाव पार, श्रीराम मठ, शिवाजीनगर परिसर, रहमतनगर, खंडोबा परिसर, बुलढाणा अर्बन वेअर हाऊसजवळ तसेच संपूर्ण गावात या कुत्र्यांची भीती निर्माण झाली आहे. ८ तारखेला रात्री कौशल्यानगरमध्ये एका भटक्या कुत्र्याने मो. फरहान मो. मतीन याला चावा घेऊन जखमी केले. तसेच अनेक बकऱ्यांनाही चावा घेतला. ग्रामपंचायतीकडे सफाई कामगारांची कमतरता आहे.
ही कुत्री पकडण्याकरिता शेतकरी शेतातील रानडुकरे पकडण्यासाठी माणसे बोलावतात. अशाच पद्धतीची माणसे बोलावून ग्रामपंचायतीने कुत्री पकडून लांब जंगलात सोडावी, अशी मागणी करणयत आली आहे. तर दुसरीकडे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर व अमोल धोटे यांनी ५ जानेवारी रोजी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आंदोलन केले. त्यानंतर ९ जानेवारीपासून कुत्रे पकडण्यास सुरुवात झाली.



