क्राईम जगत

नांदुरा बसस्थानकांत चोरट्याचे ‘मंगल…मंगल’!

दीड लाखांची मंगलपोत लंपास;मदतीचा बहाणा करून मारला डल्ला

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): बसस्थानकावर होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरी करण्याच्या घटनांमध्ये सद्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नांदुरा येथील नवीन बस स्थानकावर बसमध्ये चढत असलेल्या एका ७० वर्षीय वृध्द महिलेला चोरट्याने मदत करण्याचा बहाणा केला आणि महिलेच्या गळ्यातील एक लाख ५० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत मोठ्या शिताफीने काढून घेत घटनास्थळावरुन पोबारा केला. ९ जानेवारीच्या सायंकाळी ५ वाजता दमऱ्यान ही घटना घडली.
तेल्हारा येथील गोपाल नगरमध्ये राहणाऱ्या कांताबाई मोहनलालजी चांडक (वय ७० वर्षे) ह्या आपल्या नणंद आशाबाई नारायणदास मंत्री यांच्यासह मोताळा येथे त्यांच्या नातेवाईकांकडे चालल्या होत्या. ९ जानेवारीच्या सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नांदुरा येथील बसस्थानकातून त्या मोताळाकडे जाणाऱ्या बसमध्ये चढू लागल्या. यावेळी बसस्थानकावर असलेल्या गर्दीचा फायदा घेत पिवळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेल्या एका ४० वर्षीय इसमाने त्यांना अचूक हेरुन त्यांच्याजवळ गेला. कांताबाईंना बसमध्ये चढायला त्रास होत असल्याचे बघुन त्यापे ‘मावशी…तुमची बॅग माझ्याकडे द्या…मी तुम्हाला मदत करतो’, असे म्हणत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या हातातील बॅग घेऊन ती बसच्या पायरीवर ठेवली आणि गर्दीत फायदा घेत क्षणात त्यांच्या गळ्यातील ६ तोळे वजनाची जुनी वापरती सोन्याची मंगलपोत (किंमत एक लाख ५० हजार रुपये) अलगद तोडून घटनास्थळावरुन पोबारा केला. कांताबाई ह्या बसमध्ये चढल्यानंतर त्यांनी आपल्या गळ्याला हात लावून पाहिल, तेव्हा गळ्यातील मंगलपोत गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बसमध्ये आरडा-ओरड करुन गळ्यातील पोत चोरीस गेल्याचे सांगताच बससह परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी कांताबाई चांडक यांनी नांदुरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास चौधरी व त्यांचे सहकारी करत आहेत.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
एकट्या दुकट्या महिला प्रवाशांना चोरटे सहज हेरतात. त्यामुळे महिलांनी बसस्थानक परिसरात वावरताना, तसेच बसमधून प्रवास करताना कोणत्याही अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. सोबत असलेल्या सामान व मौल्यवान वस्तूंची स्वत: बारकाईने काळजी घ्यावी, असे आवाहन नांदुरा ठाणेदार जयवंत सातव यांनी केले आहे. नांदुरा बसस्थानकात भरदिवसा घडलेल्या चोरीच्या या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोबतच बसस्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!