स्मार्ट बुलढाणा

मातृतीर्थ सिंदखेड राजा सज्ज! 

माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सवाचा  ऐतिहासिक सोहळा

सुभाष मोहिते
बुलढाणा,(प्रतिनिधी): हिंदवी स्वराज्याच्या संकल्पिका आणि ज्यांच्या प्रेरणेतून छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य निर्माण केलं, त्या म्हणजे राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब. १२ जानेवारी २०२६ रोजी त्यांची ४२८ वी जयंती देशभरात उत्साहात साजरी होत आहे. ज्या पवित्र मातीत जिजाऊंचा जन्म झाला, ते मातृतीर्थ सिंदखेड राजाही माँसाहेबांच्या जयंती उत्सवासाठी सज्ज झाले असून प्रशासन आणि मराठा सेवा संघाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. मातृतीर्थाची पवित्र माती आपल्या भाळी लावण्यासाठी आणि जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी सालाबादप्रमाणे लाखो शिवभक्तांची सुनामी सिंदखेड राजात उसळणार आहे.
सिंदखेड राजास्थित लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यात जयंतीच्या दिवशी म्हणजेच १२ जानेवारीला पहाटे ५.३० ते ६.३० या वेळेत जिजाऊंच्या मूर्तीची आणि त्यांच्या प्रतिमेची मुख्य शासकीय महापूजा पार पाडणार असून परंपरेनुसार लखुजीराजे जाधव यांच्या वंशजांना हा मान असणार असून त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक नीलेश तांबे आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. भव्यदिव्य स्वरूपात पार पडणाऱ्या यंदाच्या उत्सवासाठी मराठा सेवा संघ आणि स्थानिक प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. उत्सवाला ५ लाखांपेक्षा जास्त शिवभक्त येण्याची शक्यता असल्याने हजारो पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी मोफत आरोग्य शिबिरे, पिण्याचे पाणी, तसेच अन्य अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्या राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवबाराजे घडवून या मातीला स्वाभिमान दिला, त्यांची जन्मभूमी असलेल्या सिंदखेड राजाची वारी, म्हणजे मराठी माणसाचे कर्तव्य मानले जाते. त्यामुळे १२ जानेवारी रोजी ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या गगनभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमणार आहे.
‘मराठा सेवा संघा’ने रचला इतिहास!
सिंदखेड राजा येथील जिजाऊ जयंतीला जुनी परंपरा असली, तरी तिला १९९० मध्ये मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी वैचारिक स्वरूप देत १२ जानेवारी हा दिवस ‘जिजाऊ जन्मोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा पायंडा पाडला आहे. मराठा सेवा संघाच्या नियोजनामुळे सिंदखेड राजातील जिजाऊ जन्मोत्सवाला जगातील सर्वात मोठ्या लोकउत्सवांपैकी एक, असे स्वरूप प्राप्त झाले आहे. वैचारिक प्रबोधन, शेतकरी मेळावे आणि बहुजन समाजाची एकजूट हे या उत्सवाचे मूळ उद्दिष्ट राहिले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!