
छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : माजी सरपंच पुत्र राजू रामचंद्र पवार (वय ४५ वर्षे ) यांची अज्ञात आरोपींनी डोक्यात, तसेच गुप्तांगावर धारदार शस्त्राचे वार करून क्रूरपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना १३ जानेवारी रोजी जामडी (फॉरेस्ट) ता. कन्नड परिसरात घडली. खुनाच्या या घटनेमुळे तालुक्यात कमालीची दहशतीचे पसरली असून हत्येचे क्रूर स्वरूप पाहता सदर प्रकार राजकीय वादातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
जामडी येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व राजू पवार १३ जानेवारीच्या सकाळी ८ वाजता दरम्यान नेहमीप्रमाणे आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. बराच वेळ उलटूनही पवार घरी परत पोहोचले नाही. कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी शेतात धाव घेतली असता, दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान शेतालगत असलेल्या वनविभागाच्या गट क्रमांक ९५ मध्ये राजू पवार यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला आढळून आला. मारेकऱ्यांनी त्यांची केवळ हत्याच केली नाही, तर त्यांच्या शरीराची घोर विटंबना करत कमरेखाली आणि गुप्तांगावर वर्मी घाव घातल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, सहायक पोलीस निरीक्षक डॉ.रामचंद्र पवार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. छत्रपती संभाजीनगर येथील श्वानपथक, ठसेतज्ज्ञ आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी घटनास्थळावर बाईकने निरीक्षण करून पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही समांतर तपास सुरू केला. मात्र,रात्री उशिरापर्यंत पोलिसांना यश आले नाही. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिसांत अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या हत्येनंतर जामडी परिसरात संतापाची लाट उसळलेली असून सध्या तणाव आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि वृद्ध आई-वडील, असा आप्त परिवार आहे.
राजकीय षडयंत्र की हत्या?
मृतक राजू पवार यांचे वडील रामचंद्र पवार हे गावचे माजी सरपंच आहेत. विद्यमान सरपंच राजू पवार यांच्या काकू रेणुका पवार ह्या आहेत. त्यामुजे राजू पवार हे काकूंच्या शासकीय कामकाजात त्यांना मदत करत. सरपंच काकू असल्यातरी ग्रामपंचायतीचा कारभार तेच बघत होते. त्यामुळे या हत्येला राजकीय वैमनस्याची किनार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे त्यांच्या गुप्तांगावर वार करून त्यांची हत्या करण्यात आली. यावरून हत्याऱ्याच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला तीव्र राग आणि वैयक्तिक बदल्याचे कारस्थान दिसून येते, हे विशेष!



