क्राईम जगत

अवैध सावकारांच्या घरावर धाडी

रिसोड,(प्रतिनिधी): रिसोड शहरासह तालुक्यात अवैध सावकारीबाबत सहकार विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ चे कलम १६ अन्वये सहकार व पोलीस विभागाच्या पथकाने रिसोड येथील सावकारांच्या घरावर छापेमारी केली. या छापेमारीत मोठे घबाड हाती लागल्याची खमंग चर्चा आहे. छापेमारीमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून संबंधितांवर काय कारवाई होते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
रिसोड शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध सावकारीचा गोरखधंदा सुरू असल्याच्या अनेक तक्रारी सहकार विभागाकडे  प्राप्त झाल्या होत्या. उपरोक्त तक्रारींच्या अनुषंगाने सहकार व पोलीस विभागाच्या दोन पथकांनी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ चे कलम १६ अंतर्गत अब्दुल रऊफ शेख चांद (रा. बाल समंदर, चांदनी चौक, रिसोड) आणि भगबान तुकाराम गुडधे (रा. नागझरी गोंदाळा, ता.रिसोड) या अवैध सावकारांच्या घरावर छापेमारी केली. या पथकांनी दोन्ही सावकारांच्या घराची झाडाझडती घेतली. यामध्ये व्यवहाराचे कागदपत्रे मिळून आले असून पथकाने सदर कागदपत्रे पुढील चौकशीसाठी जप्त केले आहे.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात तसेच सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक गितेशचंद्र साबळे यांच्या नियंत्रणाखाली पार पडलेल्या या कारवाईत रिसोड सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक गजानन फाटे, सहाय्यक निबंधक (प्रशासन) आर. आर.सावंत, सहाय्यक निबंधक (पथक प्रमुख) एम.डी.कच्छवे, सहाय्यक निबंधक आर.व्ही.आकुलवार, सहकार अधिकारी सिद्धार्थ पाटील, सहकार अधिकारी जे. एस. सहारे, पी. आर. वाडेकर, सहाय्यक सहकार अधिकारी आर.एन.शेख, सहकार अधिकारी एस. के.खान, के.व्ही.तलवारे, सहाय्यक सहकार अधिकारी बी.ए.इंगळे, एस.बी.रोडगे, सहाय्यक सहकार अधिकारी व्ही.बी.राठोड, आकाश बेले यांच्यासह पोलीस व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
सावकारांच्या गोरखधंद्यांची माहिती द्या
अवैध सावकारी व्यवहार करणाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण व कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (वाशीम) आणि प्रत्येक तालुक्यातील सावकारांचे सहाय्यक निबंधक तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपात तक्रारी दाखल कराव्यात. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन रिसोड सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक गजानन फाटे यांनी केले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!